पंचांनी पाचव्या दिवसाचा खेळ थांबवला त्या वेळी ऑस्ट्रेलियानं सहा बाद 204 धावांची मजल मारली होती.
पीटर हॅण्ड्सकोम्बने नाबाद 72 धावा केल्या. त्याने तब्बल 200 चेंडू खेळून काढले. तर मार्शने 197 चेंडूत 53 धावा केल्या.
या कसोटीत आदल्या दिवशीच्या दोन बाद 23 धावांवरून ऑस्ट्रेलियाची पहिल्या सत्रात चार बाद 63 अशी अधिकच बिकट अवस्था झाली. त्यामुळं भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. त्या कठीण परिस्थितीत शॉन मार्श आणि पीटर हॅण्ड्सकोम्बनं नेटानं ऑस्ट्रेलियाचा किल्ला लढवला.
रवींद्र जाडेजानं शॉन मार्शला माघारी धाडून ही जोडी फोडली. मग रवीचंद्रन अश्विननं ग्लेन मॅक्सवेलचा काटा काढला. पण तोवर खूप उशीर झाला होता. ऑस्ट्रेलियानं ही कसोटी वाचवण्यासाठी आवश्यक वेळ खेळून काढला होता.
उपहारापूर्वी इशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाला दोन दणके दिले. उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 83 अशी झाली होती.
आधी इशांत शर्माने सलामीवीर मॅट रेनशॉला पायचीत केलं. मग कर्णधार स्मिथच्या त्रिफळा उडवून जाडेजाने मोठा अडथळा दूर केला. रेनशॉने 44 तर स्मिथने 21 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने आज काच्या 2 बाद 23 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. रेनशॉ आणि स्मिथने संयमी फलंदाजी करत धावसंख्या हलती ठेवली. भारताची आघाडी कमी करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु होती. मात्र इशांतने भेदक गोलंदाजी करत रेनशॉला तंबूत धाडलं.
मग पुढच्याच षटकात जाडेजाने कर्णधार स्मिथचा काटा काढला.
त्यापूर्वी कालच्या चौथ्या दिवशी जाडेजाने डेव्हिड वॉर्नर आणि नाईट वॉचमन नॅथन लायनला तंबूत धाडलं होतं.
चौथ्या दिवसाचा खेळ
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली रांचीची तिसरी कसोटी चौथ्या दिवसअखेर मोठ्या नाट्यमय वळणावर उभी ठाकली. या कसोटीत टीम इंडियानं आपला पहिला डाव नऊ बाद 603 या धावसंख्येवर घोषित करून, 152 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर रवींद्र जाडेजानं डेव्हिड वॉर्नर आणि नॅथन लायनचा काटा काढून चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची दोन बाद 23 अशी बिकट अवस्था केली.
या कसोटीत टीम इंडियाला सनसनाटी विजय मिळवण्याची संधी आहे.
भारतीय संघाला रांची कसोटीवर वर्चस्व मिळवून दिलं ते पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी रचलेल्या 199 धावांच्या भागिदारीनं. पुजारानं 21 चौकारांसह 202 धावांची खेळी उभारली. रिद्धिमान साहानं आठ चौकार आणि एका षटकारासह 117 धावांची खेळी केली. त्यानंतर रवींद्र जाडेजानं पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 55 धावा ठोकून भारतीय डावाला गती दिली.
संबंधित बातम्या