मुंबई : टीम इंडियाचा फिरकीपटू आर अश्विनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. धर्मशालामध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात सुरु असलेल्या कसोटी सामन्यामध्ये स्मिथची विकेट घेऊन अश्विन हा एकाच मोसमात सर्वाधिक बळी घेणारा क्रिकेटपटू ठरला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी अश्विनने हा विक्रम रचला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथची विकेट घेऊन अश्विन हा एकाच मोसमात सर्वाधिक बळी घेणारा क्रिकेटर ठरला आहे.

हिमाचल प्रदेशमधील धर्मशालात क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला अश्विनने मागे टाकलं आहे. 2016-17 या कालावधीत 13 कसोटी सामन्यांत अश्विनने 79 विकेट्स घेतल्या आहेत. 25.64 च्या सरासरीने अश्विनने हा भीमपराक्रम केला आहे.

विशेष म्हणजे अश्विनने सात वेळा पाच बळी घेण्याची तर तीन वेळा दहा बळी घेण्याचीही किमया साधली आहे.

2007-08 या हंगामात 12 सामन्यांमध्ये स्टेनने 78 बळी घेतले होते. 16.24 च्या सरासरीने स्टेनने ही कामगिरी बजावली होती. रांची कसोटीत ग्लेन मॅक्सवेलची विकेट घेऊन अश्विनने स्टेलच्या विक्रमाची बरोबरी केली होती. मात्र स्वतःच्या नावे हा विक्रम रचण्यासाठी त्याला काही दिवस वाट पहावी लागली.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत पुणे, बंगळुरु आणि रांची कसोटीत एकूण 17 विकेट्स अश्विनने घेतल्या आहेत. चिन्नास्वामी स्टेडियमवर 6 विकेट्सच्या मोबदल्यात दिलेल्या 41 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली.

आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अश्विन पहिल्या स्थानावर होता. नुकतंच रविंद्र जाडेजाने त्याचं स्थान घेतलं.

 भारताचा नवोदित फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या धडाकेबाज गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव पहिल्याच दिवशी 300 धावांत आटोपला.

पदार्पणाच्या कसोटीत कुलदीप यादवने 4 विकेट्स घेतल्या. तर उमेश यादवने 2 तर अश्विन, जाडेजा आणि भुवनेश्वरने प्रत्येक 1  विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्हने सर्वाधिक 111 तर विकेटकिपर मॅथ्यू वेडने 57 धावा केल्या.

संबंधित बातम्या :


IndvsAus : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांत आटोपला


ब्रेट ली म्हणतो 'जगातला सर्वात महागडा ड्रिंक्समन मैदानात'


टीम इंडियासाठी स्वत: कोहली बनला वॉटर बॉय!