मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. जसप्रीत बुमराहच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर आटोपला. बुमराहला रविचंद्रन अश्विन आणि पदार्पण केलेल्या मोहम्मद सिराजनं चांगली साथ दिली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्याच षटकात मयांक अगरवालच्या रुपात धक्का बसला. मयांक शून्यावर बाद झाला. मात्र नंतर शुभमन गिल आणि पुजाराने सावधपणे खेळत पडझड होऊन दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी शुभमन गिल 28 तर पुजारा सात धावांवर खेळत आहेत. शुभमन गिलने 5 चौकारांसह 28 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कनं एक विकेट घेतली.


त्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. सलामीवीर बर्न्स शून्यावर बुमराहचा शिकार ठरला. ऑस्ट्रेलियाकडून लाबुशनेनं सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. त्यानंतर हेडनं 38 तर वाडेनं 30 धावांची खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांपुढं ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही.


टीम इंडियाकडून बुमराहनं चार, अश्विननं 3, सिराजनं 2 तर रविंद्र जाडेजानं एक विकेट घेतली. टीम इंडिया दुसऱ्या कसोटी समान्यात विराट कोहलीशिवाय मैदानात उतरली आहे. विराटच्या गैरहजेरीत संघाचं नेतृत्त्व अंजिक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे.


दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. विराट कोहलीच्या जागी अष्टपैलू रवींद्र जाडेजाला संधी मिळाली आहे. तर पृथ्वी शॉऐवजी शुभमन गिलला स्थान देण्यात आहे. या सामन्याद्वारे शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. दुखापत झाल्याने मोहम्मद शमी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळाली आहे. त्याने या सामन्यातून कसोटीत पदार्पण केलं आहे. याशिवाय भारतीय संघाने रिद्धीमान साहाच्या जागी रिषभ पंतला परत बोलावलं आहे.


तर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या कसोटीसाठी आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. डेविड वॉर्नर या सामन्यासाठी फिट नव्हता. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून जो बर्न्ससह मॅथ्यू वेड यांनी सलामीची जबाबदारी स्वीकारली होती.


चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर अतिशय दबाव आहे, कारण पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताचा डाव केवळ 36 धावांवर आटोपला होता.