मुंबई : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात 2014 मध्ये झालेल्या वादानंतर बीसीसीआयचं वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाशी बिनसलं होतं. मात्र आता दोन्ही नियामक मंडळांमध्ये संबंध सुधारत असल्याचं चित्र आहे. येत्या जुलै- ऑगस्ट दरम्यान भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या दौऱ्यात 4 कसोटी सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे.


 
वादानंतर दोन्ही संघामध्ये कोणत्याही मालिकेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. मात्र 2014 च्या अपूर्ण मालिकेनंतर दोन्ही नियामक मंडळांतील सर्व मतभेद मिटवण्यात आले आहेत, असं वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष डेव कॅमरन यांनी सांगितलं. या निर्णयाचं स्वागत करताना त्यांनी बीसीसीआयचे आभार देखील मानले आहेत.

 
दरम्यान बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डासोबत संबंध सुधारत असल्याचा आम्हाला आनंद आहे, असंही ठाकूर म्हणाले. क्रिकेटच्या विकासामध्ये वेस्ट इंडीज संघाचंही मोठं योगदान राहिलेलं आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांना आनंद होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.