India Para-Athlete Chirag Tyagi Shot Dead : गाझियाबादमध्ये भारताचा 25 वर्षीय आंतरराष्ट्रीय T12 पॅरा-ॲथलीट चिराग त्यागी याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिरागचा मृतदेह शनिवारी गाझियाबादमधील कोतवाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साई कुंज परिसरात आढळून आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला आहे.
नेमकं काय घडलं? (India Para-Athlete Chirag Tyagi)
शनिवारी पोलिसांना साई कुंज भागात एका तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मृतदेहाची ओळख पटवली असता, तो आंतरराष्ट्रीय पॅरा-ॲथलीट चिराग त्यागी असल्याचं स्पष्ट झालं. चिराग हा गाझियाबादचाच रहिवासी होता आणि एका पार्कमध्ये त्याचा मृतदेह आढळला.
या घटनेबाबत माहिती देताना डीसीपी (DCP) धवल जैस्वाल यांनी सांगितले की, "प्रथमदर्शनी हे प्रकरण हत्येचे असल्याचे दिसत आहे. चिरागवर गोळ्या झाडण्यात आल्याचा संशय आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी केली असून, त्याआधारे एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. तसेच चिरागच्या कुटुंबीयांशीही पोलीस संवाद साधत आहेत. त्यांच्याकडून लेखी तक्रार घेतल्यानंतर रीतसर गुन्हा दाखल केला जाईल आणि पुढील कायदेशीर पावले उचलली जातील."
आशियाई पॅरा गेम्ससाठी झाली होती निवड (India Para-Athlete Chirag Tyagi Shot Dead)
चिराग त्यागीने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर नुकतेच मोठे यश संपादन केले होते. मृत्यूच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी त्याने बेंगळुरू येथे आयोजित राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. या सुवर्णपदकासह त्याने 2026 च्या शेवटी जपानमध्ये होणाऱ्या 'पॅरा आशियाई खेळांसाठी' (Para Asian Games) पात्रता (Qualify) मिळवली होती. हा ऐतिहासिक विजय साजरा करून चिराग दिल्लीतील आपल्या घरी परतत होता, मात्र यादरम्यान त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या दुर्दैवी घटनेमुळे क्रीडा जगतात आणि त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
सहकाऱ्यावर हत्येचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, चिरागच्या हत्येचा संशय त्याच्याच एका सहकारी ॲथलीटवर व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी त्या सहकाऱ्याला ताब्यात घेतले असून, जुन्या वादातून किंवा वैयक्तिक वैमनस्यातून ही हत्या झाली आहे का, यादृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत. एका उदयोन्मुख खेळाडूचा अशा प्रकारे अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा -
