मुंबई : Team India भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू श्रीसंत हा जवळपास ७ वर्षांपासून खेळापासून दूर आहे. पण, आता त्याच्यावर असणारे हे निर्बंध उठवण्यात आल्यामुळं तब्बल सात वर्षांहून अधिक काळानंतर आता तो स्थानिक क्रिकेटमधून या क्षेत्रात पुनरागमन करण्यास तयार झाला आहे. १० जानेवारीपासून सुरु होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीसाठी केरळच्या संभाव्य संघात त्याची निव़ड झाल्याचं कळत आहे.


श्रीसंतवर ऑगस्ट 2013ला IPL सामन्यादरम्यान स्प़ॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीचे आरोप सिद्ध झाल्यानंतर शिक्षा म्हणून BCCI कडून निर्बंध लावण्यात आले होते. ज्याअंतर्गत त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. पण, सर्वोच्च न्यायालयानं मात्र त्याला आरोपमुक्त करत दिलासा दिला.

श्रीसंतच नव्हे तर, भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज सुरेश रैना हासुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर आता उत्तर प्रदेशच्या वतीनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सामन्यांमध्ये खेळणार आहे.

37 वर्षीय श्रीसंतला केरळच्या 26 खेळाडूंमध्ये निवडण्यात आल्याचं कळत आहे. परिणामी निर्बंध उठवल्यानंतर आता अधिकृतपणे त्याची निवड झाली हे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मुख्य म्हणजे 26 खेळाडूंमध्ये त्याची निवड झाली असली तरीही आता पुढं 15 खेळाडूंच्या यादीत त्याचं नाव असणार का, याकडेच सर्वांचं लक्ष असेल.

श्रीसंतनं आतापर्यंत भारतासाठी 27 कसोटी सामने, 52 एकदिवसीय सामने आणि 10 टी20 सामन्यांत योगदान दिलं आहे.


बऱ्याच काळानंतर रैनाही मैदानात...

एकिकडे श्रीसंतच्या पुनरागमनाची चर्चा असतानाच दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वर्तुळातून दूर गेलेला सुरेश रैना याच्याही नावाची चर्चा सुरु आहे. खुद्द रैनानंच यासंबंधी ट्विट करत काही फोटोही पोस्ट केले होते. आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये आपण सक्रिय असू, असं रैनानंच स्पष्ट केलं होतं. पण, यंदाच्या वर्षी काही कौटुंबिक कारणांमुळं त्याला आयपीएल सामन्यांनाही मुकावं लागलं होतं.