India at Commonwealth Games 2026 : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी कायम आहे. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी दोन रौप्यपदकांची भर पडली. वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर कौर आणि अॅथलेटिक्समध्ये गुलवीर सिंग यांनी रौप्यपदक जिंकत भारताची मान उंचावली. याशिवाय बॉक्सिंगमध्ये भारताचे किमान तीन पदके निश्चित झाली आहेत. या दोन रौप्यपदकांमुळे भारताच्या एकूण पदकांची संख्या 12 वर पोहोचली असून पदकतालिकेत भारताने नववे स्थान गाठले आहे. भारताच्या खात्यात सध्या 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 12 पदके जमा झाली आहेत.
हरजिंदर कौरची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी
महिलांच्या 69 किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या 29 वर्षीय हरजिंदर कौरने शानदार प्रदर्शन करत रौप्यपदक पटकावले. तिने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क या दोन्ही प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत एकूण 227 किलो वजन उचलले. स्नॅच फेरीत हरजिंदरने अनुक्रमे 96 किलो, 99 किलो आणि 101 किलो वजन यशस्वीरीत्या उचलले. त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये तिने 120 किलो, 123 किलो आणि अखेरच्या प्रयत्नात 126 किलो वजन उचलत एकूण 101 + 126 = 227 किलो वजनाची नोंद केली.
ही कामगिरी तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरली. या स्पर्धेत कॅनडाच्या शार्लेट सिमोन्यू हिने 236 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले, तर ऑस्ट्रेलियाच्या फीबे हेमन हिने 218 किलो वजनासह कांस्यपदक जिंकले.
गुलवीर सिंगचा ऐतिहासिक पराक्रम
पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या अंतिम शर्यतीत भारतीय धावपटू गुलवीर सिंग याने ऐतिहासिक कामगिरी करत रौप्यपदक जिंकले. 27 वर्षीय गुलवीर भारतीय सैन्यात नायब सुभेदार म्हणून कार्यरत आहे. शर्यतीच्या अखेरच्या फेरीपर्यंत गुलवीर चौथ्या स्थानावर होता. मात्र शेवटच्या टप्प्यात त्याने अफलातून वेग पकडत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आणि 27 मिनिटे 49.78 सेकंद या वेळेत शर्यत पूर्ण करत रौप्यपदकावर नाव कोरले. सुवर्णपदक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या काय रॉबिन्सन याच्यापेक्षा गुलवीर अवघ्या 0.85 सेकंदांनी मागे राहिला. तरीही त्याच्या या कामगिरीने भारतीय अॅथलेटिक्सच्या इतिहासात नवे पान लिहिले.
भारताची पदकसंख्या 12 वर
सहाव्या दिवसाअखेर भारताच्या खात्यात एकूण 12 पदके जमा झाली आहेत. त्यामध्ये 2 सुवर्णपदके, 7 रौप्यपदके आणि 3 कांस्यपदके अशा एकूण 12 पदकांसह भारत पदकतालिकेत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान, पदकतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर कायम असून त्यांनी 35 सुवर्णांसह एकूण 80 पदके जिंकत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. भारतीय खेळाडूंच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आगामी दिवसांतही भारताच्या पदकसंख्येत आणखी वाढ होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा -
