मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधल्या तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. विंडीजविरुद्धच्या आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीला विश्रांती दिली आहे. धोनीच्या अनुपस्थितीत रिषभ पंतच्या खांद्यावर यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात रिषभ पंत हाच धोनीचा वारसदार असणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

महेंद्रसिंग धोनीने रिषभ पंतला वन डे पदार्पणासाठी इंडिया कॅप दिली, तो दिवस होता 21 ऑक्टोबर 2018. तोच धोनी आता ट्वेन्टी ट्वेन्टीत आपला वारसदार म्हणून रिषभ पंतच्या हातात बॅटन देतो आहे का?

रोहित शर्माची टीम इंडिया आणि जेसन होल्डरची वेस्ट इंडियन फौज कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आमनेसामने येत आहे. निमित्त आहे उभय संघांमधल्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याचं. भारत आणि विंडीज संघांमध्ये तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारतीय संघ तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे.

टीम इंडियाच्या आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे विंडीज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मिळून सहा सामन्यांमधून अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. धोनीच्या अनुपस्थितीत या सामन्यांमध्ये रिषभ पंत यष्टिरक्षकाच्या भूमिकेत, तर दिनेश कार्तिकसारखा अनुभवी शिलेदार निव्वळ फलंदाजाच्या भूमिकेत खेळताना दिसणार आहे.

भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा तर, ट्वेन्टी ट्वेन्टीमधल्या धोनीयुगाची ही अखेर नाही. पण हाच धोनी कदाचित 2019 सालच्या वन डे विश्वचषकानंतर, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच त्याचा वारसदार तयार करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे.

टीम इंडियाचा हंगामी कर्णधार रोहित शर्माच्या मते, विंडीज आणि ऑस्ट्रेलिया संघांविरुद्धचे ट्वेन्टी ट्वेन्टी सामने म्हणजे रिषभ पंतला स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे. रिषभ पंतसारख्या युवा यष्टिरक्षकाला संधी मिळावी, म्हणून दस्तुरखुद्द धोनीनेच आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा विराट कोहलीने केला आहे. तसंच धोनी हा भारताच्या वन डे संघाचा अविभाज्य घटक असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनीही धोनीच्या ट्वेन्टी ट्वेन्टीतल्या युगाची अजूनही अखेर झाली नसल्याचं म्हटलं आहे.

धोनीने 2007 साली टीम इंडियाला ट्वेन्टी ट्वेन्टीचा विश्वचषक जिंकून दिला होता. त्याने आजवरच्या कारकीर्दीत 93 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. भारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळण्याचा मानही धोनीच्याच नावावर आहे. त्याने या 93 सामन्यांत दोन अर्धशतकांसह 1487 धावा फटकावल्या आहेत. धोनीचा ट्वेन्टी ट्वेन्टीतला स्ट्राईक रेट आहे 127.09. त्याने कर्णधार म्हणून 72 पैकी 42 सामने भारताला जिंकून दिले आहेत.

ट्वेन्टी ट्वेन्टीचा आगामी विश्वचषक हा 2020 साली खेळवण्यात येणार आहे. 2019 सालच्या वन डे विश्वचषकाअखेर निवृत्त होण्याची शक्यता असलेला धोनी साहजिकच आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात खेळू शकणार नाही. त्यामुळे धोनीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी आणि पर्यायाने वन डेतल्याही वारसदाराचा शोध घेण्याची हीच वेळ आहे. रिद्धिमान साहा आणि दिनेश कार्तिक हे दोघंही आताच पस्तिशीच्या जवळ आले आहेत. त्यामुळे युवा शिलेदार म्हणून टीम इंडिया आणि बीसीसीआयच्या निवड समितीने रिषभ पंतवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे.