कोलंबो : रोहित शर्माच्या टीम इंडियासह श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश असलेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या तिरंगी मालिकेला आजपासून कोलंबोत सुरुवात होत आहे. या मालिकेतल्या सलामीच्या सामन्यात भारताचा मुकाबला श्रीलंकेशी होत आहे.

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय क्रिकेटरसिकांना संधी मिळणार आहे ती ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या तिरंगी मालिकेचा आनंद लुटण्याची.

रोहित शर्माच्या टीम इंडियासह यजमान श्रीलंका आणि बांगलादेश संघांचा या तिरंगी मालिकेत समावेश आहे. या तिरंगी मालिकेतल्या साऱ्या सामन्यांचं आयोजन कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरच करण्यात येणार आहे. त्यातल्या सलामीच्या सामन्यात भारताची गाठ ही श्रीलंकेशी पडणार आहे.

टीम इंडियानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत घवघवीत यश संपादन केलं. त्या दौऱ्याचा ताण हलका करण्यासाठी बीसीसीआयनं कर्णधार विराट कोहली आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीसह कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या या प्रमुख शिलेदारांना विश्रांती दिली आहे.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रीलंकेतल्या तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची सूत्रं रोहित शर्माच्या हाती सोपवण्यात आली आहेत. रोहित शर्मानं आजवर कर्णधार या नात्यानं चार ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांत जबाबदारी सांभाळली आहे. त्या चारही सामन्यांमध्ये भारतीय संघानं विजय साजरा केला होता.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार या नात्यानंही रोहितच्या गाठीशी आयपीएलच्या रणांगणातला सर्वोच्च अनुभव आणि यश आहे. त्यामुळं कर्णधार या नात्यानं टीम इंडियाला श्रीलंकेत विराट कोहलीची अनुपस्थिती भासणार नाही, अशी आशा आहे.

विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांची एक कर्णधार या नात्यानं अनुपस्थिती जाणवू न देण्याची मोठी जबाबदारी रोहितसह शिखर धवन, सुरेश रैना आणि मनीष पांडेवर राहिल. यष्टिरक्षक म्हणून निवड झालेल्या दिनेश कार्तिक आणि रिषभ पंतचाही भारतीय फलंदाजीला मोठा आधार लाभेल.

रिषभ पंतनं यंदा मुश्ताक अली ट्वेन्टी ट्वेन्टी स्पर्धेत अवघ्या ३२ चेंडूंमध्ये शतक ठोकण्याचा पराक्रम गाजवला होता. श्रीलंकेतल्या मालिकेतही भारतीय संघाला त्याच्याकडून अशाच तडफदार खेळींची अपेक्षा राहील.

दक्षिण आफ्रिका दौरा गाजवणाऱ्या प्रमुख गोलंदाजांऐवजी भारतीय संघात शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. शार्दूलनं दक्षिण आफ्रिकेतल्या अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं केलं होतं. पण डावखुऱ्या जयदेव उनाडकटवर आयपीएलच्या लिलावात आलेली साडेअकरा कोटींची बोली सार्थ ठरवण्याची अजूनही जबाबदारी आहे.

चायनामन कुलदीप यादवच्या अनुपस्थितीत यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर भारताच्या फिरकी आक्रमणाची भिस्त राहिल.

आयसीसीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या क्रमवारीत टीम इंडिया सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत श्रीलंका आठव्या तर बांगलादेश दहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळं श्रीलंकेतल्या तिरंगी मालिकेच्या रणांगणात भारतीय संघाचं पारडं जड मानलं जात आहे. त्यात टीम इंडियानं गेल्या वर्षभरात ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या पाच मालिकांवर आपलं वर्चस्व गाजवलं आहे. युवा खेळाडूंचा भरणा असलेली रोहित शर्माची टीम इंडियाही श्रीलंकेतही तीच विजयी परंपरा कायम राखेल, असा जाणकारांना विश्वास आहे.