पुणे : कर्णधार म्हणून आपला 50व्या कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने दमदार शतकाची नोंद केली. त्याच्या कारकीर्दीचं हे 26वं कसोटी शतक आहे. दहा डावांनंतर शतक करण्यात त्याला यश आलं आहे. विराटने याआधी डिसेंबर 2018 मध्ये पर्थ कसोटीत शतक ठोकलं होतं.


दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सध्या सुरु असलेल्या पुणे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराटने 173 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. त्याच्या या खेळीत 16 चौकारांचा समावेश आहे.

कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांच्या बाबतीत विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉण्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर आता 19-19 शतकांची नोंद आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ 25 शतकांसह अव्वल स्थानावर आहे.

कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं
25 शतकं : ग्रॅमी स्मिथ
19 शतकं : रिकी पॉण्टिंग/विराट कोहली
15 शतकं : अॅलन बॉर्डर/स्टीव्ह वॉ/स्टीव्ह स्मिथ

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 26 शतकं करण्याच्या बाबतीत डॉन ब्रॅडमन, स्टीव्ह स्मिथ आणि सचिन तेंडुलकर यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. ब्रॅडमन यांनी 69, स्मिथने 121 आणि सचिनने 136, तर विराटने 138 डावांमध्ये 26 शतकं केली आहेत.

सर्वात कमी डावात 26 कसोटी शतकं
69 डाव : डॉन ब्रॅडमन
121 डाव : स्टीव्ह स्मिथ
136 डाव : सचिन तेंडुलकर
138 डाव : विराट कोहली
144 डाव : सुनील गावसकर
145 डाव : मॅथ्यू हेडन

महेंद्रसिंह धोनीनंतर 50 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्त्व करणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. कोहलीने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात हा मान मिळवला.

विराट कोहली आधी माजी कर्णधार सौरव गांगुलीसह (कर्णधार म्हणून 49 कसोटी) संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर होता. महेंद्र सिंह धोनीने 2008 पासून 2014 पर्यंत 60 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्त्व केलं होतं.