IND vs SA 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. कारण भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याला दुखापत झालीये.  30 डिसेंबरला टीम इंडियाचे सराव सत्र सुरु होते. यावेळी शार्दुल दुखापतग्रस्त झालाय. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात (IND vs SA 2nd Test) विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्याच्या दृष्टीने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. दरम्यान, शार्दुल दुखापतग्रस्त झाल्याने सामन्यापूर्वीच भारताला धक्का बसलाय.


दुसऱ्या सामन्याला मुकण्याची शक्यता 


शार्दुलला दुखापत झाल्याने तो मालिकेतील दुसऱ्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या दुखापतीबद्दल माहिती समोर आलीये. मीडिया रिपोर्टनुसार, शार्दुल सध्यातरी ठीक आहे. शनिवारी सेंच्युरियनमध्ये सरावसत्र सुरु होते. यावेळी त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झालीये. दुखापत झाल्यानंतर शार्दुल आराम करण्यासाठी बाहेर गेला. टीम इंडियाच्या वैद्यकीय टीमने त्याला अद्याप त्याला उपचारासाठी कोणताही सल्ला दिलेला नाही. दुखापतग्रस्त झाला असूनही शार्दुलने फलंदाजी सुरुच ठेवली आहे. 


पहिल्या सामन्यात शार्दुलचा फ्लॉप शो 


पहिल्या सामन्यात भारताला 3 दिवसांच्या खेळानंतर पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात शार्दुलला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने फलंदाजी करताना पहिल्या डावात 24 तर दुसऱ्या डावात 2 धावा केल्या. तर गोलंदाजी करताना द. आफ्रिकेच्या पहिल्या डावात त्याने 1 विकेट पटकावली होती. आफ्रिकेला दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची गरजच पडली नाही. 


सराव सत्रासाठी मैदानात उतरले होते 'हे' खेळाडू


सेंच्युरियनच्या मैदानावर भारतीय खेळाडूंचे सराव सत्र सुरु होते. या सत्रात केवळ 7 ते 8 खेळाडू सहभागी झाले होते. शार्दुलशिवाय, कर्णधार रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, केएस भरतही सरावासाठी मैदानात उतरले होते. शिवाय भारतीय संघाचे प्रशिक्षकही यावेळी मैदानावार उपस्थित होते. 


भारतीय संघात होणार बदल


दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या अंतिम 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध कृष्णा दुसऱ्या कसोटीतही खेळणार का? यावर सध्या प्रश्न विचारले जात आहेत. त्याने पहिल्या कसोटीत पदार्पण केले होते. त्याला 1 विकेट पटकावण्यात यश आले होते. शिवाय तो पहिल्या कसोटीत महागडाही ठरला होता. टीम इंडियासमोर प्रसिद्धच्या जागी मुकेश कुमार आणि आवेशचा पर्याय उपलब्ध आहे. रवींद्र जाडेजाही दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


IND vs AUS : अटीतटीच्या लढतीत टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव; ऑस्ट्रेलियाचा तीन धावांनी निसटता विजय अन् मालिकाही जिंकली