ICC T20 World Cup 2021 Groups : क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान संघातला सामना म्हटला की क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच. दोन वर्षांपूर्वी आयसीसीच्या वन डे विश्वचषकात याच दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना रंगला होता. आणि आता दोन वर्षानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने येणार आहेत. निमित्त आहे आयसीसीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचे.


आयसीसीने टी20 विश्वचषकाची गटवारी नुकतीच जाहीर केली. यात भारत आणि पाकिस्तानचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. ब गटातल्या या संघांमध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडसह पात्रता फेरीतल्या दोन संघांचा समावेश असणार आहे. तर अ गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि पात्रता फेरीतून येणारे दोन संघ असतील. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा पार पडणार आहे.


विश्वचषकात टीम इंडियाच सरस


ट्वेन्टी ट्वेन्टी असो किंवा वन डे विश्वचषक. क्रिकेटच्या सर्वोच्च स्तरावरच्या या महासंग्रात नेहमीच टीम इंडियानं वर्चस्व गाजवले आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आजवर भारत आणि पाकिस्तान संघात पाच लढती झाल्या आहेत. त्या पाचही लढतीत भारतीय संघ वरचढ ठरला आहे. 2007 च्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात महेंद्रसिंग धोनीच्या संघाने पाकिस्तानचाच पराभव करत अजिंक्यपद पटकावले होते. 1992 पासून वन डे विश्वचषकतही भारताने विजयाची परंपरा 2019 च्या इंग्लंडमधल्या विश्वचषकापर्यंत कायम राखली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा पाकिस्तानवर वर्चस्व गाजवण्याचा 'मौका' टीम इंडियाला मिळणार आहे.


स्पर्धा परदेशात पण, यजमान भारतच!


खरंतर यंदाचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक भारतात होणार होता. पण भारतातल्या कोरोना परिस्थितीमुळे बीसीसीआयने स्पर्धा परदेशात खेळवण्याचा निर्णय घेतला.  संयुक्त अरब अमिरात आणि  ओमान या दोन देशातल्या चार शहरांमध्ये विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. पण स्पर्धा देशाबाहेर असली तरी यजमानपद मात्र भारताकडेच राहणार आहे.


संबंधित बातम्या :


ICC T20 World Cup 2021 Groups : आयसीसीकडून टी-20 वर्ल्डकपमधील ग्रुपची घोषणा; भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने