Asian Games 2023:  आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानवर (India beat Pakistan) दणदणीत मात केली आहे. 'अ' गटातील सामन्यात भारताने पाकिस्तानवर 10-2 अशी मात केली आहे. या पराभवामुळे आता उपांत्य फेरीत खेळण्याच्या पाकिस्तानच्या स्वप्नांना धक्का लागण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह याने सर्वाधिक चार गोल डागले. तर, वरुणने दोन गोल केले. त्याशिवाय, समशेर, मनदीप, ललित आणि सुमित यांनी प्रत्येकी एक गोल केला. हॉकीत भारताने पाकिस्तानवर मिळवलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. 


भारताची आक्रमक सुरुवात


हॉकीच्या या महत्त्वाच्या लढतीत भारतीय संघाने पहिला गोल पहिल्या सत्राच्या 8व्या मिनिटाला केला. यानंतर दुसरा गोलही 11व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकमध्ये झाला. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवरून अप्रतिम गोल केला. दुसरा हाफ संपण्यापूर्वी सुमित, ललित आणि गुरजंत यांनी उत्कृष्ट समन्वय दाखवत चौथा गोल केला. उत्तरार्ध संपल्यानंतर या सामन्यात भारत 4-0 ने आघाडीवर होता.






तिसऱ्या सत्रात पाकिस्तानचा तोकडा प्रतिकार


या सामन्याच्या तिसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारताने आपली लय कायम ठेवली आणि पेनल्टी स्ट्रोकद्वारे पाचवा गोल केला. यानंतर पाकिस्तानने पेनल्टी स्ट्रोकमध्ये 1 गोल केला. मात्र, भारताने आणखी 2 गोल केले आणि गोल संख्या 7-1 अशी नेली. तिसरं सत्र संपण्यापूर्वी पाकिस्तानने आणखी एक गोल केला आणि स्कोअर लाइन 7-2 अशी वाढवली.


भारताचा ऐतिहासिक विजय 


भारताने सामन्याच्या शेवटच्या सत्रात आपली लय कायम ठेवत आणखी 3 गोल केले आणि 10-2 अशा फरकाने सामना संपवला. या सामन्यात पाकिस्तानी संघाकडून अनेक लहान चुकाही दिसून आल्या. आता भारताला अ गटातील शेवटचा सामना बांगलादेश संघाविरुद्ध खेळायचा आहे.


 






भारतीय हॉकी संघाने स्पर्धेच्या-अ गटामध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंतच्या सगळ्या सामन्यात विजय मिळवला आहे.  भारताने उझबेकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 16-0 असा विजय मिळवला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने सिंगापूर संघाचा 16-1 असा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात जपानच्या बलाढ्य संघाविरुद्ध 4-2 असा रोमहर्षक विजय मिळवला.