मुंबई:  इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत द्विशतक झळकावणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

विराटनं 340 चेंडूंतली 235 धावांची खेळी 25 चौकार आणि एका षटकारानं सजवली. विराटचं कसोटी कारकीर्दीतलं ते तिसरं द्विशतक ठरलं.

विराट कोहलीच्या या जबरदस्त खेळीमुळं मुंबई कसोटीत भारताला इंग्लंडवर 231 धावांची आघाडी घेता आली. तसेच विराटनं जयंत यादवच्या साथीनं आठव्या विकेटसाठी 241 धावांची भागीदारीही रचली होती. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

इंग्लंडवर एक डाव 36 धावांनी मात

टीम इंडियानं इंग्लंडचा एक डाव आणि 36 धावांनी धुव्वा उडवून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. डावानं पराभव टाळण्यासाठी इंग्लंडला 231 धावांची आवश्यकता होती. पण इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 195 धावांतच आटोपला.

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं दुसऱ्या डावात सहा विकेट्स काढल्या आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

अश्विनला एक डझन विकेट

रविचंद्रन अश्विननं मुंबई कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून 12 विकेट्स काढण्याचा पराक्रम गाजवला.

अश्विननं कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात पाच विकेट्स काढण्याची कामगिरी बजावण्याची ही 24 वी वेळ ठरली. तर एकाच कसोटीत 10 किंवा दहापेक्षा अधिक विकेट्स काढण्याचा पराक्रम गाजवण्याची अश्विनची ही सातवी वेळ आहे.

केवळ अनिल कुंबळेनंच अश्विनपेक्षा जास्तवेळा म्हणजे आठवेळा एकाच कसोटीत दहा किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स काढल्या होत्या.

अश्विननं इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील चार कसोटींमध्ये मिळून आतापर्यंत 27 विकेट्स काढल्या आहेत. एकाच कसोटी मालिकेत 25 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स काढण्याची अश्विनची ही चौथी वेळ असून, त्यानं याबाबतीत कपिलदेवच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.

संबंधित बातमी
एकाच कसोटीत 1 डझन विकेट, अश्विनचा पराक्रम

वानखेडेवर तिरंगा, इंग्लंडवर 1 डाव 36 धावांनी मात