India vs England: टीम इंडिया आणि इंग्लंडदरम्यान आजपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरु होतोय. दुसऱ्या टेस्टआधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर दुखापतीमुळं संघाबाहेर गेला आहे. त्याच्या जागेवर इशांत शर्माचा अंतिम अकरामध्ये समावेश होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं सांगितलं की, शार्दुल दुखापतग्रस्त आहे.  शार्दुल ठाकुरनं पहिल्या कसोटीत चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. मात्र शार्दुल तिसऱ्या टेस्टसाठी तयार होईल, असं कोहली म्हणाला.  


पावसामुळं इंग्लंडविरोधातील पहिला कसोटी सामना अनिर्णित झाल्यानंतर आजपासून दुसरी कसोटी खेळली जाणार आहे. लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या या दुसऱ्या कसोटीत दोन्ही संघांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडला दोन मोठे धक्के बसले आहेत. इंग्लंडचे दोन वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे सामन्यातून बाहेर झाले आहेत. जेम्स अँडरसनच्या जागी क्रेग ओवरटन तर ब्रॉडच्या जागी साकिब महमूद अंतिम अकरामध्ये असतील अशी शक्यता आहे.  सोबतच इंग्लंडच्या संघात युवा ओपनर हसीब हमीदचं पुनरागमन होऊ शकतं तसंत अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला देखील अंतिम अकरा मध्ये स्थान मिळू शकतं. 


इंग्लंडच्या 24 वर्षीय हसीब हमीदने 2016 मध्ये भारताविरुद्ध पदार्पण केलं होतं. यात पहिल्या टेस्टमध्ये त्यानं शानदार 82 धावांची खेळीही केली होती. त्या मालिकेनंतर त्याला संघात जागा मिळाली नव्हती.  पहिल्या कसोटीत इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर रोरी बर्न्स आणि डॉमिनिक सिब्ली दोघेही चांगली खेळी करु शकले नाहीत. त्यामुळं दोघांपैकी एकाला डच्चू मिळू शकतो. सोबतच बेन स्टोक्स आणि क्रिस वोक्सच्या अनुपस्थितीत मोईन अलीला संघात स्थान मिळू शकतं.  


इंग्लंडविरुद्धच्य पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या दिवशी विजयासाठी 157 धावांची गरज होती. टीम इंडियाकडे 9 विकेट्स शिल्लक होत्या मात्र शेवटच्या दिवशीचा खेळ पावसामुळं होऊच शकला नाही. पहिल्या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव 303 धावांवर संपुष्टात आला होता.  तर भारताने आपल्या दुसऱ्या डावात 1 बाद 52 धावा केल्या होत्या.  इंग्लंडने कर्णधार जो रुटच्या शतकाच्या बळावर दुसऱ्या डावात आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. भारताकडून पहिल्या डाव चार विकेट्स घेणाऱ्या बुमराहने दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या तर मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या.  
  
पहिल्या डावात इंग्लंडला भारताने 183 धावांवर गुंडाळले होते. कर्णधार रुटच्या अर्धशतकाशिवाय कुणीही मोठी खेळी करु शकलं नाही. भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूरच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचा संघ 183 धावांवर आटोपला. इंग्लंडचा डाव 183 धावांवर गुंडाळल्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी 97 धावांची दमदार सलामी दिली होती. मात्र त्यानंतर राहुल आणि जाडेजा वगळता टीम इंडियाकडूनही कुणाला मोठी खेळी करता आली नाही. जाडेजाने ८ चौकार आणि एका षटकाराची आतषबाजी खेळी केली. त्यानंतर आलेल्या जसप्रीत बुमराहने फटकेबाजी करत 28 धावा केल्या होत्या.  त्यामुळं भारताचा पहिला डाव 278 धावांवर गुंडाळला. भारताकडून राहुलनं 84, जाडेजानं 56 धावा केल्या. इंग्लंडकडून पहिल्या डावात रॉबिन्सननं 5 तर अॅंडरसननं 4 विकेट्स घेतल्या होत्या.