बर्मिंगहॅम : टीम इंडिया आणि इंग्लंड संघांत एजबॅस्टन कसोटी जिंकण्यासाठी सीसॉचा खेळ सुरु आहे. या कसोटीत टीम इंडियासमोर विजयासाठी 194 धावांचं आव्हान आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं तिसऱ्या दिवसअखेर पाच बाद 110 धावांची मजल मारली आहे.


टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अजूनही 43 धावांवर खेळत आहे. त्यामुळे या कसोटीत टीम इंडियाच्या आव्हानात अजूनही धुगधुगी कायम आहे.


तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी विराटच्या साथीने दिनेश कार्तिक 18 धावांवर खेळत होता. इंग्लिश गोलंदाजांनी भारताचा निम्मा संघ अवघ्या 78 धावांत माघारी धाडला होता. त्या परिस्थितीत विराट आणि कार्तिकने सहाव्या विकेटसाठी 32 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताचा डाव सावरला.


ईशांत शर्मा आणि रवीचंद्रन अश्विनच्या प्रभावी गोलंदाजीनं टीम इंडियाला एजबॅस्टन कसोटी जिंकण्याची संधी मिळवून दिली आहे. या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा दुसरा डाव 180 धावांत गुंडाळला. इंग्लंडला पहिल्या डावात मिळालेली 13 धावांची आघाडी जमेस धरता, टीम इंडियासमोर विजयासाठी 194 धावांचं आव्हान आहे.


भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मानं 51 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडून इंग्लंडला गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. पहिल्या डावात चार विकेट्स घेणारा ऑफ स्पिनर अश्विन दुसऱ्या डावातही प्रभावी ठरला. त्यानं दुसऱ्या डावात तीन विकेट्स काढल्या.


तिसऱ्या दिवशी इंग्लंडने दुसऱ्या डावाची सुरुवात 1 बाद 9 धावा अशी केली. मात्र भारतीय अश्विन आणि ईशांत शर्माच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या खेळाडूंचा निभाव लागू शकला नाही. पहिल्या डावात इंग्लंडचा डाव सावरणारे ज्यो रूट आणि जॉनी बेअरस्टो या डावात मात्र संघाला सावरू शकले नाहीत.


कोहलीचं ऐतिहासिक शतक


पहिल्या डावात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं इंग्लंडच्या भूमीवर पहिलं वहिलं कसोटी शतक झळकावून, एजबॅस्टन कसोटीत भारताच्या आव्हानात नवी जान भरली. विराटच्या जिगरबाज 149 धावांनी टीम इंडियाला पहिल्या डावात सर्व बाद 274 धावांची मजल मारुन दिली.


विराटचं हे आजवरच्या कारकीर्दीतलं 22 वं आणि इंग्लिश भूमीवरचं पहिलं कसोटी शतक ठरलं. इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी डावात अर्धशतक ठोकणारा कोहली हा पाचवा भारतीय कप्तान ठरला आहे.


विजय हजारे (1952 मध्ये 89 धावा), मन्सूर अली खान पतौडी (1967 मध्ये 64 धावा), अजित वाडेकर (1971 मध्ये 85), मोहम्मद अझरुद्दीन (1990 मध्ये 120 धावा) यांच्या पंक्तीत कोहली पोहचला आहे.


इंग्लंडला पहिल्या डावात 287 धावांवर रोखलं


मोहम्मद शमीनं सॅम करनला माघारी धाडून एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावाला 287 धावांवर पूर्णविराम दिला. या कसोटीत इंग्लंडनं पहिल्या दिवसअखेर नऊ बाद 285 धावांची मजल मारली होती. इंग्लंडला त्या धावसंख्येत आज केवळ दोन धावांची भर घालता आली.


करननं शमीच्या उजव्या यष्टिबाहेरच्या चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या हाती सोपा झेल दिला. तो शमीनं तिसरी विकेट ठरला. भारताकडून रवीचंद्रन अश्विननं 62 धावांत चार, तर शमीनं 64 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्या दोघांच्या प्रभावी गोलंदाजीमुळंच इंग्लंडचा डाव चार बाद 216 धावांवरून 287 धावांत कोसळला.