बर्मिंगहॅम: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं इंग्लंडच्या भूमीवर पहिलं वहिलं कसोटी शतक झळकावून, एजबॅस्टन कसोटीत भारताच्या आव्हानात नवी जान भरली. विराटच्या जिगरबाज 149 धावांनी टीम इंडियाला पहिल्या डावात सर्व बाद 274 धावांची मजल मारुन दिली.


दुसऱ्या डावात इंग्लंडला अॅलिस्टर कूकच्या रुपात पहिला धक्का बसला. कूकला दुसऱ्या डावात भोपळाही फोडता आला नाही. अश्विनने चौथ्या ओव्हरमध्ये कूलला माघारी धाडलं. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडची धावसंख्या 1 बाद 9 अशी होती.


विराटच्या या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडला पहिल्या डावात अवघ्या तेरा धावांची आघाडी मिळाली. या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 287 धावांत आटोपला होता. त्यानंतर टीम इंडियाची आठ बाद 182 अशी घसरगुंडी उडाली.


संघाची पडझड होत असताना विराटनं एक खिंड थोपवून धरली आणि एक संयमी शतक साजरं केलं. विराटचं आजवरच्या कारकीर्दीतलं हे बाविसावं आणि इंग्लिश भूमीवरचं पहिलं कसोटी शतक ठरलं. विराटच्या 225 चेंडूंमधल्या 149 धावांच्या खेळीला 22 चौकार आणि एका षटकारांचा साज होता.


विराटचं हे आजवरच्या कारकीर्दीतलं 22 वं आणि इंग्लिश भूमीवरचं पहिलं कसोटी शतक ठरलं. इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी डावात अर्धशतक ठोकणारा कोहली हा पाचवा भारतीय कप्तान ठरला आहे.


विजय हजारे (1952 मध्ये 89 धावा), मन्सूर अली खान पतौडी (1967 मध्ये 64 धावा), अजित वाडेकर (1971 मध्ये 85), मोहम्मद अझरुद्दीन (1990 मध्ये 120 धावा) यांच्या पंक्तीत कोहली पोहचला आहे.


विराटने आजवरच्या कारकीर्दीत इंग्लंडमधल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये केवळ 134 धावाच जमवल्या होत्या. एजबॅस्टनवरच्या शतकाने विराटने मागच्या दौऱ्यातलं अपयश धुवून काढलं, असं म्हणावं लागेल.


शतक झळकवल्यानंतर कोहलीने त्याच्या गळ्यात अडकवलेल्या अनुष्काच्या रिंगचं चुंबन घेऊन सेलिब्रेशन केलं.


विराट वगळता इतर भारतीय फलंदाजांकडून निराशा


विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी अशी शतकी खेळी केली. मात्र इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. चेतेश्वर पुजाराच्या जागी संधी मिळालेल्या लोकेश राहुल पहिल्या डावात आपली चमक दाखवता आली नाही. राहुल अवघ्या 4 धावांवर बाद झाला.


मुरली विजय 20 धावा, शिखर धवन 26 धावा, अजिंक्य रहाणे 15 धावा आणि हार्दिक पांड्याने केवळ 22 धावा केल्या.


इंग्लंडला पहिल्या डावात 287 धावांवर रोखलं


मोहम्मद शमीनं सॅम करनला माघारी धाडून एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावाला 287 धावांवर पूर्णविराम दिला. या कसोटीत इंग्लंडनं पहिल्या दिवसअखेर नऊ बाद 285 धावांची मजल मारली होती. इंग्लंडला त्या धावसंख्येत आज केवळ दोन धावांची भर घालता आली.


करननं शमीच्या उजव्या यष्टिबाहेरच्या चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या हाती सोपा झेल दिला. तो शमीनं तिसरी विकेट ठरला. भारताकडून रवीचंद्रन अश्विननं 62 धावांत चार, तर शमीनं 64 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्या दोघांच्या प्रभावी गोलंदाजीमुळंच इंग्लंडचा डाव चार बाद 216 धावांवरून 287 धावांत कोसळला.


पहिल्या दिवसाचा खेळ


इंग्लंडने पहिल्या कसोटीत टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी काल तिसऱ्या सत्रात बजावलेल्या प्रभावी कामगिरीमुळं एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडचा डाव पहिल्या दिवसअखेर नऊ बाद 285 असा गडगडला. कर्णधार ज्यो रूट आणि जॉनी बेअरस्टोनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 104 धावांच्या भागीदारीनं इंग्लंडला चार बाद 216 धावांची मजल मारून दिली होती. पण ज्यो रुट धावचीत झाला आणि इंग्लंडचा डाव कोसळला.


एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडच्या डावाला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावली ती कर्णधार ज्यो रूटनं. इंग्लंडचा सलामीवीर अॅलिस्टर कूक स्वस्तात माघारी परतला. पण रूटनं किटन जेनिंग्सच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची आणि जॉनी बेअरस्टोच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा डाव सावरला. रूटनं 156 चेंडूंत नऊ चौकारांनी 80 धावांची खेळी सजवली. जॉनी बेअरस्टोनं नऊ चौकारांसह 70 धावांची खेळी उभारली.