IND vs BAN : भारताचा एक डाव 46 धावांनी दणदणीत विजय
एबीपी माझा वेबटीम | 24 Nov 2019 02:45 PM (IST)
कोलकात्याच्या ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्यात टीम इंडियानं तिसऱ्याच दिवशी बांगलादेशचा एक डाव आणि 46 धावांनी दारुण पराभव केला.
कोलकाता : ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्यात टीम इंडियानं तिसऱ्याच दिवशी बांगलादेशचा एक डाव आणि 46 धावांनी दारुण पराभव केला. या विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडियानं 2-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. आजच्या सामन्यानंतर जलदगती गोलंदाज इशांत शर्मा याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 241 धावांच्या भक्कम आघाडीनंतर भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशची दुसऱ्या डावातही धूळदाण उडवली. ईशांत शर्माच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचा दुसरा डाव 195 धावांत आटोपला. ईशांत शर्माने दुसऱ्या डावात 4 फलंदाजांना माघारी धाडून सामन्यात 9 बळी मिळवले तर उमेश यादवने दुसऱ्या 5 फलंदाजांना बाद करत सामन्यात 8 बळी मिळवले. बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने सर्वाधिक 74 धावांची खेळी करुन एकाकी झुंज दिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशची सहा बाद 152 अशी अवस्था झाली होती. आजच्या दिवसात बांगलादेशला केवळ 43 अधिक धावा जोडता आल्या. भारतीय जलदगती गोलंदाजांसमोर बांगलादेशचा संघ टिकू शकला नाही. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं ऐतिहासिक कोलकाता कसोटीत (दुसऱ्या दिवशी) खणखणीत शतक झळकावलं. डे-नाईट कसोटीत भारताकडून पहिलं शतक झळकावण्याचा मान विराटनं मिळवला. तायजुल इस्लामच्या गोलंदाजीवर दुहेरी धाव घेत 159 चेंडूत विराटनं शतकाला गवसणी घातली. त्याच्या या शतकी खेळीत 12 चौकारांचा समावेश होता. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 27 शतकं झळकावण्याच्या सचिनच्या विक्रमाशी विराटने बरोबरी केली आहे. 141 डावांत विराटने आपलं 27 वं शतक झळकावलं आहे.