बंगळुरु : ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज शतकाने बंगळुरुच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाला टीम इंडियावर सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह दोन सामन्यांच्या मालिकेत 2-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं.

या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला थोडंथोडकं नाही, तर 191 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. पण ग्लेन मॅक्सवेलने ठोकलेल्या शतकामुळे भारतानं दिलेलं आव्हान अगदीच खुजं ठरवलं. मॅक्सवेलने 55 चेंडूंत सात चौकार आणि नऊ षटकारांसह नाबाद 113 धावांची खेळी उभारली.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने कर्णधार विराट कोहलीच्या 72 धावांच्या जोरावर 4 गडी गमावून 190 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने मात्र तीन विकेट्स गमावून दोन चेंडू शिल्लक ठेवतच लक्ष्य गाठलं.
2015 भारत पहिल्यांदाच घरच्या मैदानात झालेल्या टी20 मालिकेत पराभूत झाला.

टी20 क्रिकेटमध्ये मॅक्सवेलचं हे तिसरं शतक ठरलं. मॅक्सवेलने टी20 मध्ये कॉलिन मनुरोच्या तीन शतकांची बरोबरी केली. भारताचा सलामीवीर रोहित शर्माच्या नावे आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम नोंद आहे. रोहितने चार टी 20 शतकं केली आहेत.

मॅक्सवेलशिवाय ऑस्ट्रेलियाच्या डार्सी शॉटने 28 चेंडूंमध्ये 40 धावांची खेळी केली. नाबाद राहिलेल्या पीटर हँड्सकॉबने 18 चेंडूंमध्ये 20 धावा केल्या. मार्कस स्टोयनिसने सात, तर कर्णधार एरॉन फिंचने आठ धावा केल्या.

भारताकडून गोलंदाज युजवेंद्र चहलने चार षटकात 47 धावा दिल्या. मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही. चहलशिवाय सिद्धार्थ कौलने 45 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली.