हैदराबाद : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा तिसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली.


हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार होता. मात्र पावसामुळे ओल्या झालेल्या आऊटफिल्डवर खेळ होणं शक्य नसल्यानं  हा सामना रद्द करण्यात आला.

या मालिकेतील पहिला सामना भारतानं जिंकला होता तर दुसऱ्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियानं बाजी मारली होती. त्यामुळे दोन्ही संघांना मालिकेत 1-1 अशा बरोबरीत समाधान मानावं लागलं.

भारतीय संघाला हा सामना जिंकून 70 वर्षात नवा विक्रम रचण्याची संधी होती. पण पावसाच्या एंट्रीमुळे टीम इंडियाची ही संधी मात्र हुकली.



भारतानं हा सामना जिंकला असता तर 70 वर्षात भारत पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला तीनही फॉरमॅटमध्ये सलग चारवेळा हरवण्याचा विक्रम रचणार होता. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या मागील तीनही मालिकेत विजय मिळवला आहे.

2016 मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात टी 20 मालिकेत 3-0 ने हरवलं होतं. त्यानंतर भारतातील कसोटी मालिका 2-1 ने जिंकली होती, मग आता नुकत्याच झालेल्या वन डे मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला 4-1 ने धूळ चारली होती. पण पावसानं भारताची ही सुवर्णसंधी मात्र हुकवली.

दरम्यान, ही संपूर्ण मालिकाच ऑस्टेलियासाठी चांगली ठरली नाही. कारण की, या संपूर्ण मालिकेतील 7 सामन्यांपैकी फक्त दोनच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजय मिळवता आला.