सिडनी  : सिडनी कसोटीत आज चौथ्या दिवशी पावसामुळे अवघ्या 24.5 षटकांचाच खेळ होऊ शकला. आजच्या दिवसाचं पहिलं सत्र पावसामुळे पूर्णपणे वाया गेलं. त्यानंतर दुसऱ्या सत्रात चहापानानंतर पावसानं पुन्हा हजेरी लावली. पंचांनी चौथ्या दिवशी खेळ थांबवला त्यावेळी फॉलोऑननंतर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात बिनबाद सहा धावांची मजल मारली आहे. या कसोटीचा उद्याचा एक दिवस बाकी असून टीम इंडियाकडे अजूनही 316 धावांची भक्कम आघाडी जमा आहे.


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरच्या कसोटीत आज चौथ्या दिवशी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 300 वर रोखले. पावसामुळे हा सामना सुरू होण्यास विलंब झाल्यानो उपाहारापर्यंतचा खेळ वाया गेला होता.  उपाहाराच्या विश्रांतीनंतर दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली. पुढे खेळताना यजमानांनी 3 गडी झटपट गमावले. मात्र ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या जोडीने चांगली झुंज दिली. पण कुलदीप यादवच्या वादळासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 300 वर आटोपला.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला असून टीम इंडियाकडे 322 धावांची आघाडी आहे. भारताकडून कुलदिप यादवने 5 रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीनं 2 तर  बुमराहने एका फलंदाजांला माघारी धाडले.

ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या चौथ्या अंतिम कसोटी सामन्यात पाऊस ऑस्ट्रेलियन संघाचा तारणहार बनून आला होता. चौथ्या दिवशी पावसामुळे उपहारापर्यंत एकही चेंडू खेळला गेला नाही.  तिसऱ्या दिवसाचा खेळदेखील अपुऱ्या प्रकाशामुळे थांबवण्यात आला होता.

सिडनी कसोटीत टीम इंडियाच्या प्रभावी माऱ्यामुळे तिसऱ्या दिवशी चहापानानंतर ऑस्ट्रेलियाची सहा बाद 236 अशी अवस्था झाली होती. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्कस हॅरिसनं आठ चौकारांसह 79 धावांची खेळी उभारली. पण हॅरिस वगळता कांगारुंच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला होता.   सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतच्या दमदार शतकांमुळे टीम इंडियाने सिडनी कसोटीत आपला पहिला डाव सात बाद 622 धावांवर घोषित केला. भारताने ऑस्ट्रेलियात उभारलेली ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली.

भारताच्या चेतेश्वर पुजाराचे द्विशतक अवघ्या सात धावांनी हुकले. त्याने 373 चेंडूंचा सामना करताना 193 धावांची बहारदार खेळी केली. त्यात 22 चौकारांचा समावेश होता. पुजारापाठोपाठ रिषभ पंतनेही कसोटी कारकीर्दीतले दुसरे शतक झळकावले. त्याने 15 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 159 धावांचे योगदान दिले. पंतने रवींद्र जाडेजाच्या साथीने सातव्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी रचली. जाडेजानेही 107 चेंडूत 81 धावा केल्या. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने बिनबाद 24 धावांची मजल मारली होती.