ind vs aus 4th test day 4 highlights ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर भारतीय संघ ऑस्ट्रेलियानं दिलेलं 328 धावांचं आव्हान स्वीकारत मैदानात आला, तेव्हा सुरुवातीच्याच काही षटकांत पावसामुळं व्यत्यय आला आणि अखेर या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. सध्याच्या घडीला 1.5 षटकांचा खेळ पूर्ण झाला असून, भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल खेळपट्टीवर उपस्थित आहेत. भारतीय संघाच्या खात्यात 4 धावा जोडल्या गेल्या असून, पाचव्या दिवसाचा खेळ सुरु होईल तेव्हा या खेळाडूंवर संघाची धुरा असेल.








ब्रिस्बेमनधील गाबा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याच भारलाता ऑस्ट्रेलियाच्या संघानं विजयासाठी 328 धावांचं आव्हान दिलं. चौथ्या सामन्यातील चौथ्या दिवशी आपल्या दुसऱ्या खेळीत ऑस्ट्रेलियाच्या संघानं सर्वबाद 294 इतकी धावसंख्या उभी केली. यामध्ये भारताकडून मोहम्मद सिराज यानं 71 धावा देत 5 गडी बाद करत सर्वांचं लक्ष वेधलं.


पहिल्या खेळीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघानं 369 धावा केल्या होत्या. ज्याचा पाठलाग करत मैदानात आलेल्या भारतीय संघानं 336 धावा केल्या. परिणामी ऑस्ट्रेलियाला 33 धावांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या खेळीत ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथनं सर्वाधिक 55 धावा केल्या. 74 चेंडू खेळणाऱ्या स्मिथनं 7 चौकार लगावले. तर, पहिल्या खेळीत अपयशी ठरलेल्या डेव्हिड वॉर्नर यानं 75 चेंडू खेळत संघाच्या धावसंख्येत 48 धावांचं योगदान दिलं.


भारताकडून सिराजनं 5, शार्दुल ठाकूरनं 4, तर वॉशिंग्टन सुंदरनं विरोधी संघाचा एक-एक गडी बाद केला.


पावसामुळं सामन्यात वारंवार व्यत्यय


पावसामुळं ब्रिस्बेन कसोटीमध्ये चौथ्या दिवशी चहापानासाठी सामना निर्धारित वेळेपूर्वीच थांबवण्यात आला. ज्यामुळं सामन्यातील अर्ध्या तासाचा वेळ व्यर्थ गेला. यापूर्वी दुसऱ्या दिवशीही शेवटच्या सत्रावर पावसाचा असाच परिणाम पाहायला मिळाला होता. मुख्य म्हणजे अखेरच्या म्हणजेच पाचव्या दिवशीही ब्रिस्बेनमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं या सामन्याचा निकाल नेमका काय असेल, याबाबत क्रिकेटप्रेमींना साशंकता आहे.