नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्स संघाने यंदा पहिल्यांदाच इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) अंतिम फेरीत धडक मारली. या यशात सिंहाचा वाटा उचलणारा कोच रिकी पॉन्टिंग आता ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात दाखल झाला असून नेटमध्ये जस्टिन लँगरच्या मदतीला आला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पॉन्टिंग वेळ न दवडता सरावामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम होता. नेटमध्ये गोलंदाजी केली आणि 27 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेसाठी संघाला मार्गदर्शन करीत आहेत.
शनिवारी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टोनिस म्हणाला, "पॉन्टिंग हबमध्ये असून क्वॉरंटाईन आहे, तो आपल्या वेळेबद्दल खूप उदार आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वीपासूनचं शेवटपर्यंत गोलंदाजी करतो. थकल्यानंतर मगचं झोपी जातो.
ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्रा म्हणतो.. हा गोलंदाज भारताविरुद्ध कहर करणार
स्टोनिसने खेळाडू तर पॉन्टिंगने कोच म्हणून दिल्ली कॅपिटल्सला पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्टोनिस म्हणाला, की पॉन्टिंगकडून त्यांना खूप पाठिंबा व आत्मविश्वास मिळाला. प्रशिक्षक म्हणून पॉटिंग बद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो आपल्या खेळण्याच्या शैलीमध्ये छेडछाड करीत नाही.
तो म्हणाला, "तो खेळाडू म्हणूनच नव्हे तर प्रशिक्षक म्हणूनही तो खूप चांगला आहे. आपण सगळ्यांनीच ऐकलंय की तो किती शानदार आहे. पॉन्टिंगला जे वैयक्तिकरित्या ओळखतात त्यांना माहिती आहे, की तो इतका चांगला का आहे? आणि खेळाडू म्हणून तो का चांगला होता. तो तुमच्यातील आत्मविश्वास ज्या प्रकारे वाढवतो, तुम्हाला शिकवण्याची त्याची पद्धत विलक्षण आहे."
स्टोनिस पुढे म्हणाला, की "त्याने मला फक्त मदतचं नाही तर मार्गही दाखवला. मी त्याला काही दिवसांपासून ओळखतो आहे. तेव्हापासून तो माझ्यासोबत उदारपणे वागत आहे. खाली बसून सूचना करणाऱ्यांमधील पॉन्टिंग नाही. तो तुमच्यासोबत येऊन तो मार्ग दाखवतो.