ओव्हल: दक्षिण आफ्रिकेवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवत टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य (सेमीफायनल) फेरीत धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये भारतीय संघ 15 जूनला बांगलादेशशी भिडणार आहे. पण हा सामना न खेळताही टीम इंडिया फायनलचं तिकीट मिळवू शकतं.


होय... जर या सामन्यात पावसानं आपला खेळ सुरु केला आणि जर टीम इंडिया बांगलादेशचा सामना झालाच नाही तर टीम इंडिया थेट फायनलमध्ये प्रवेश करु शकतं.

चॅम्पियन्स ट्रॉफी 'ग्रुप बी'मध्ये भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारतानं पाकिस्तान आणि द. आफ्रिकेला पराभूत करुन सेमीफायनलमध्ये धडक मारली. तर श्रीलंकेविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पण चांगल्या रनरेटमुळे गुणतालिकेत भारत सध्या अव्वल स्थानी आहे.

तर 'ग्रुप ए'मधून सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की करणाऱ्या बांगलादेशचे 3 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आले होते. तर त्यानंतर बांगलादेशनं न्यूझीलंडला पराभूत करुन 2 गुण मिळवले होते. तर इंग्लडविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. पण तीन अंक मिळवत बांगलादेशनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये बांगलादेशचा सामना भारताशी होणार आहे.

पण गुणतालिकेत अव्वल स्थानी असल्यानं त्याचा फायदा भारताला सेमीफायनलच्या सामन्यात होऊ शकतो. जर या सामन्यात पाऊस आला तर टीम इंडिया थेट फायनलमध्ये प्रवेश करु शकतं.

15 जूनला भारत आणि बांगलादेशमध्ये उपांत्य फेरीचा सामना बर्मिंगहममध्ये खेळविण्यात येणार आहे. इथंच टीम इंडिया आणि पाकिस्तानच्या सामन्यात पावसानं बराच अडथळा आणला होता. जर या सामन्यातही पावसानं हजेरी लावली आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर गुणांच्या आधारावर टीम इंडिया थेट फायनलमध्ये प्रवेश करेल.

असं होऊ शकतं कारण की, सेमीफायनल सामन्यासाठी कोणताही रिझर्व दिवस ठेवण्यात आलेला नाही. तर फायनलसाठी मात्र, रिझर्व दिवस ठेवण्यात आला आहे.