पराभवाचं नाही, पाकने संघर्ष न करता भारतासमोर लोटांगण घेतल्याचं दुःख : इम्रान खान
एबीपी माझा वेब टीम | 05 Jun 2017 10:14 PM (IST)
लंडन : भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात पाकिस्तानला 124 धावांनी हरवून विजयी सलामी दिली. मात्र पाकिस्तानच्या या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू संघाच्या कामगिरीवर चांगलेच भडकले आहेत. विजय आणि पराभव हा खेळाचाच भाग आहे, हे एक खेळाडू म्हणून समजू शकतो. मात्र पाकिस्तानने काहीही संघर्ष न करता भारतासमोर लोटांगण घेतल्याने दुःख झालं, असं पाकिस्तानचे माजी कर्णधार इमरान खान यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने या सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला आहे. सामन्याचा निकाल निराशाजनक आहे. मात्र यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील क्रिकेट पद्धती आणि क्रिकेट बोर्डात सुधारणा करण्याची वेळ आली असल्याचं शोएब अख्तरने म्हटलं आहे. यावेळी भारत आणि पाकिस्तान संघांमधील जे अंतर होतं, ते किती तरी मोठं होतं. आतापर्यंत एवढं अंतर कधीही राहिलं नाही. भारतीय संघ पुढे जात गेला आणि पाकिस्तानचा संघ मागे पडला. त्यामुळे खेळावर लक्ष केंद्रीत करुन दडपण न आणता खेळणं गरजेचं असल्याचं पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद अफ्रिदीने म्हटलं आहे. दीर्घ श्वास... 10 पर्यंत उजळणी म्हणा आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. ही कठिण वेळ आहे, मात्र या संघाला कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे, असं पाकिस्तानचे माजी क्रिकेटर रमीज राजा यांनी म्हटलं आहे.