नवी दिल्ली : दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कुस्तीत भारताला पदक मिळवून देणारा पैलवान सुशील कुमार यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही. कारण भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत सुशील कुमारचं नावच नाही.
भारतीय कुस्ती महासंघाने आयओएला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या संभाव्या खेळाडूंची यादी सोपवली. मात्र या यादीत सुशील कुमारचं नाव नाही. त्यामुळे सुशील कुमारऐवजी नरसिंह यादव भारताचं प्रतिनिधित्त्व करेल, असं म्हटलं जात आहे.
बदललेल्या नियमांचा फटका सुशील कुमारला
सुशील कुमार आणि नरसिंह यादव हे दोघेही 74 किलो वजनी गटात खेळतात. त्यातच नरसिंह यादवने आधीच ऑलिम्पिकचं तिकीट बुक केल्याने सुशीलला स्पर्धेसाठी कोणताच गट शिल्लक नाही. पण यंदा बदललेल्या नियमांचा फटका सुशील कुमारला बसला आहे. त्यामुळे भारताला पदक मिळवून देणारा सुशीलकुमार यंदाच्या ऑलिम्पिक पथकात नसणार आहे.
सुशील कुमार आणि नरसिंहचा दावा
"माझी कारकीर्द चांगली असल्याने मला पाठवावं, असा माझा हट्ट नाही. पण जर दोन उमेदवार असतील तर त्यांच्यात ट्रायल होऊन त्यापैकी एकाला पाठवायला हवं. ऑलिम्पिकमध्ये देशासाठी एक कोटो असतो, वैयक्तिक नाही," असं सुशील कुमार म्हणाला.
"तर मी जिंकून रिओ ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय केलं आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये जाण्याचा अधिकार माझा आहे," असं नरसिंह यादवचं म्हणणं आहे.