Iga Swiatek wins Wimbledon 2025 : विम्बल्डन 2025 मधील महिला एकेरीचा अंतिम सामना शनिवारी इगा स्वियाटेक (पोलंड) आणि अमांडा अनिसिमोवा (यूएसए) यांच्यात खेळला गेला. पोलंडच्या आठव्या मानांकित इगा स्वियाटेक हिने अखेर विम्बल्डन 2025 च्या महिला एकेरी विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. सेंटर कोर्टवर झालेल्या अंतिम सामन्यात तिने 13व्या मानांकित अमांडा अनिसिमोवा हिला सरळ सेटमध्ये पराभूत केले. स्वियाटेकने पहिल्या सेटमध्ये अनिसिमोवाला 6-0 ने पराभूत केले आणि दुसऱ्या सेटमध्येही तसाच एकतर्फी खेळ करत 6-0 अशी विजयाची मोहोर उमटवली. स्वियाटेकच्या कारकिर्दीतील हे पहिले विम्बल्डन विजेतेपद आहे.

फायनल सामना कसा राहिला...

इगा स्वियाटेकने पहिला सेट फक्त 25 मिनिटांत 6-0 ने पटकावला. तिने अमांडा अनिसिमोवाला लव्हवर रोखत सेट संपवला. अनिसिमोवाने 14 अनफोर्स्ड एरर केल्या, तर स्वियाटेककडून फक्त 2 चुका झाल्या. दुसऱ्या सेटमध्येही स्वियाटेकने पूर्ण पकड ठेवली आणि एक तासाच्या आतच विजेतेपद आपल्या नावे केले.

इगा स्वियाटेकने सेमीफायनलमध्ये बेलिंडा बेनसिचला 6-2, 6-0 ने पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. तर 23 वर्षांच्या अनिसिमोवाने टॉप मानांकित आर्यना सबालेन्काला तीन सेटच्या थरारक सामन्यात 6-4, 4-6, 6-4 असा पराभव केला आणि अंतिम फेरीत पोहोचली.

2016 पासून दरवर्षी नवीन विजेता

2016 नंतरपासून विम्बलडन महिला एकेरी स्पर्धेत दरवर्षी नवीन विजेत्या आले आहेत. 2016 नंतर क्रमाक्रमाने गार्बाइन मुगुरुजा (2017), एंजेलिक कर्बर (2018), सिमोना हालेप (2019), ऐश बार्टी (2021), एलेना रिबाकिना (2022), मार्केटा वोंड्रोसोवा (2023) आणि बारबोरा क्रेजिकोवा (2024) यांनी विम्बलडनचा सुवर्णपदक जिंकला आहे. या मालिकेत यंदाही नवी महिला चॅम्पियन जोडली गेली आहे, ती म्हणजे पोलंडची इगा स्वियाटेक, जिने 2025 चा विम्बलडन महिला एकेरी खिताब आपल्या नावावर केला आहे.

स्वियाटेकचा सहावा ग्रँडस्लॅम किताब 

इगा स्वियाटेकने आपल्या कारकिर्दीतील सहावं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं आहे. यामध्ये तिनं आतापर्यंत चार वेळा फ्रेंच ओपन, एकदा यूएस ओपन आणि आता पहिल्यांदाच विम्बल्डन जिंकला आहे. 2025 मध्ये तिचा ग्रँड स्लॅम विजय-पराजय विक्रम 17-2 आहे. यापूर्वी, ती ऑस्ट्रेलियन ओपन आणि रोलँड गॅरोसच्या उपांत्य फेरीत पोहोचली होती.

स्वियाटेकचा खास विक्रम

विम्बल्डन महिला एकेरी फायनलमध्ये स्वियाटेक पहिल्या सेटमध्ये 6-0 असा स्कोर घेऊन जिंकणारी ओपन एरातील चौथी महिला खेळाडू ठरली आहे. आधी बिली जीन किंग (1973, 1975), क्रिस एवर्ट (1974) आणि मार्टिना नवरातिलोवा (1983) या तीन महान खेळाडूंनी हेच यश मिळवले होते.