मुंबई : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचं काऊण्टडाऊन सुरु झाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विजेतेपदाचा चषक उंचावणाऱ्या संघावर बक्षिसांची खैरात होणार, हे साहजिकच. विश्वविजेत्याला यंदा किती रुपयाचं इनाम मिळणार याची माहिती समोर आली आहे. विजेत्या संघाला तब्बल 4 मिलियन यूएस डॉलर म्हणजेच अंदाजे 28 कोटी 13 लाख 92 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.

यंदा उपविजेत्याला मिळणारी रक्कमही थोडी-थोडकी नसून त्याच्या निम्मी म्हणजेच दोन मिलियन डॉलर अर्थात 14 कोटी 6 लाख 96 हजार इतकी आहे. विशेष म्हणजे उपान्त्य फेरीत धडक मारलेल्या दोन पराभूत संघांनाही प्रत्येकी आठ लाख डॉलर (5 कोटी 62 लाख 78 हजार 400 रुपये) मिळतील. तर लीग मॅचेसपर्यंत मजल मारणाऱ्या दोन संघांना प्रत्येकी 40 हजार डॉलर्स (28 लाख 13 हजार 920 रुपये) ची बक्षिसी मिळेल.

चार दशलक्ष डॉलर हे आजवरच्या विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च पारितोषिक आहे. गेल्या वेळी म्हणजेच 2015 मधील क्रिकेट विश्वचषकात विजेच्या ऑस्ट्रेलिया संघाला 3.75 मिलियन डॉलर मिळाले होते. विश्वचषकातील एकूण पारितोषिकांची रक्कम ही गेल्यावेळ प्रमाणेच 10 मिलियन डॉलर इतकी आहे.

Prithvi Shaw | मुंबई टी-20 लीगच्या निमित्ताने पृथ्वी शॉसोबत खास बातचीत | मुंबई 



विश्वचषकात खेळवल्या जाणाऱ्या 48 सामन्यांवर 32 कॅमेरांची नजर असेल. यामध्ये आठ अल्ट्रा मोशन हॉक-आय कॅमेरा, फ्रण्ट आणि रिव्हर्स व्ह्यू स्टम्प कॅमेरा आणि स्पायडरकॅमचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या आठ संघांनी आयसीसीच्या वनडे क्रमवारीनुसार 30 सप्टेंबर 2017 रोजीच विश्वचषक स्पर्धेत स्थान निश्चित केलं होतं. तर वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान या दोन संघांनी मार्च महिन्यात क्वॉलिफायर स्पर्धा पार करुन जागा मिळवली.

भारतीय संघात कोण कोण?

कर्णधार:

अनेक महिन्यांपासून भारतीय संघाचं यशस्वी नेतृत्त्व करणारा विराट कोहली विश्वचषकात नेतृत्त्व करणार आहे.

उपकर्णधार:

रोहित शर्मा उपकर्णधाराची जबाबदारी पार पाडेल. रोहित शर्मानेही त्याच्या नेतृत्त्वात टीम इंडियासाठी महत्त्वाच्या स्पर्धा जिंकून नेतृत्त्व गुण सिद्ध केलं आहे.

यष्टीरक्षक:

विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीबाबत कोणतीही शंका नाही. पण टीम इंडियामध्ये दुसऱ्या विकेटकीपरबाबत सुरु असलेला वाद संपला आहे. बॅकअप विकेटकीपर म्हणून दिनेश कार्तिकला संघात स्थान दिलं आहे. दिनेश चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करुन टीम इंडियाच्या अडचणी दूर करु शकतो. शिवाय गरज असल्यास जलद फलंदाजीही करु शकतो.

एकीकडे दिनेश कार्तिकची कामगिरी मागील दीड वर्षात चांगली आहे. यामुळेच रिषभ पंतऐवजी त्याला संधी देण्यात आली आहे.

मधली फळी:

टीम इंडियाच्या मधल्या फळीत विराट कोहली, एमएस धोनीसह केदार जाधव, विजय शंकर संघात महत्त्वाची भूमिका बजावतील. विजय शंकरची मागील काही महिन्यांमधील कामगिरी उत्तम आहे.

भारतीय संघावर एक कटाक्ष : विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के एल राहुल, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी यांचा समावेश संघात करण्यात आला आहे.

भारताकडे काय आहे?

जगातील सर्वोत्कृष्ट तीन क्रिकेटपटू

जगातील सर्वोत्कृष्ट जलदगती गोलंदाज

दोन उत्कृष्ट जलदगती गोलंदाज

जगातील दोन उत्तम फिरकीपटू

अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज

भारताकडे काय नाही?

मधळ्या फळीतला डावखुरा फलंदाज

डावखुरा जलदगती गोलंदाज

प्रस्थापित मधली फळी

दहा षटकं टाकू शकेल असा अष्टपैलू जो दोन प्रमुख गोलंदाजांना साथ देईल.

भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगेल.

भारत-पाक भिडणार

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत दोन वर्षांपूर्वी ओव्हल मैदानावर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ समोरासमोर आले होते. यावेळी पाकिस्तानने 180 धावांनी टीम इंडियाचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे भारत पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक असेल. मँचेस्टरमध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात रविवारी 16 जून 2019 रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे.

भारताचे सामने :

दिनांक - प्रतिस्पर्धी संघ

बुधवार 5 जून - द. आफ्रिका
रविवार 9 जून - ऑस्ट्रेलिया
गुरुवार 13 जून - न्यूझीलंड
रविवार 16 जून - पाकिस्तान
शनिवार 22 जून - अफगाणिस्तान
गुरुवार 27 जून - वेस्ट इंडिज
रविवार 30 जून - इंग्लंड
मंगळवार 2 जुलै - बांगलादेश
शनिवार 6 जुलै - श्रीलंका

मंगळवार 9 जुलै - उपान्त्य फेरी 1
बुधवार 10 जुलै - राखीव दिवस
गुरुवार 11 जुलै - उपान्त्य फेरी 2
शुक्रवार 12 जुलै - राखीव दिवस
रविवार 14 जुलै - अंतिम फेरी

संबंधित बातम्या


World Cup 2019 साठी टीम इंडिया जाहीर : भारताकडे काय आहे, काय नाही?