डर्बी (इंग्लंड):  भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा 16 धावांनी पराभव करून, महिला विश्वचषकात सलग चौथा विजय साजरा केला. या विजयानं भारताचं उपांत्य फेरीचं तिकीट जवळजवळ निश्चित झालं आहे.


भारतीय महिलांनी श्रीलंकेला विजयासाठी 50 षटकांत 233 धावांचं आव्हान दिलं होतं. पण श्रीलंकेला 50 षटकांत सात बाद 216 धावांचीच मजल मारता आली. भारताकडून झुलान गोस्वामी आणि पूनम यादवनं प्रत्येकी दोन विकेट्स काढून श्रीलंकेला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली.

त्याआधी भारतानं 50 षटकांत आठ बाद 232 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताकडून दीप्ती शर्मा आणि मिताली राजनं तिसऱ्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी उभारली. दीप्ती शर्मानं 78, तर मिताली राजनं 53 धावांची खेळी उभारली. त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमूर्तीनं सहाव्या विकेटसाठी 50 धावांची वेगवान भागीदारी केली. हरमनप्रीतनं 22 चेंडूंत 20, तर वेदानं 32 चेंडूंत 29 धावांची खेळी केली.