लंडन : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत लंडनच्या ऐतिहासिक लॉर्डस स्टेडियमवर आज खेळवण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 49 धावांनी पराभव करुन विश्वचषकाच्या शर्यतीतले आपलं स्थान पुन्हा बळकट केलं आहे. परंतु या सामन्यातल्या पराभवाने दक्षिण आफ्रिकेचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 309 धावांचे आव्हान दिले होते. परंतु पाकिस्तानचं हे आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना पेलता आलेलं नाही.

309 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पाकिस्तानच्या मोहम्मद आमिर, वहाब रियाझ आणि शादाब खानने 50 षटकांत नऊ बाद 259 धावांमध्ये रोखलं. रियाझ आणि शादाबने प्रत्येकी तीन, तर आमिरने दोन फलंदाजांना माघारी धाडलं. पाकिस्तानचा हा विश्वचषकातला दुसरा विजय ठरला आहे. विश्वचषकाच्या गुणतालिकेत पाकिस्तान आता पाच गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या बाबर आझम आणि हॅरिस सोहेलच्या दमदार फलंदाजीमुळे पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 309 धावांचं मोठं आव्हान उभं केलं होतं. या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजीवर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं.

सलामीवीर इमाम उल हक आणि फखर झमानने 81 धावांची सलामी दिली. त्या दोघांनी प्रत्येकी 44 धावांचे योगदान दिले. त्यानंतर बाबर आझम आणि हॅरिस सोहेलने खेळाची सूत्रं आपल्या हातात घेत पाकिस्तानच्या डावाला आकार दिला. बाबर आझमने 69 तर सोहेलने 89 धावा फटकावल्या. त्यामुळे पाकिस्तानला 50 षटकांत सात बाद 308 धावांची मजल मारता आली.