लंडन : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आज (बुधवारी) झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडन न्यूझीलंडच्या संघाचा 119 धावांनी धुव्वा उडवला आहे. इंग्लंडने आज विश्वचषकातला सहावा विजय साजरा केला आहे. या विजयासह इंग्लंडच्या खात्यात नऊ सामन्यांअखेर 12 गुण झाले आहेत. इंग्लंडने बारा गुणांसह विश्वचषकाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंडनं न्यूझीलंडवर मिळवलेल्या या विजयाने पाकिस्तानचं विश्वचषकातलं उरलंसुरलं आव्हान जवळजवळ संपुष्टात आलं आहे.


या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 306 धावांचं आव्हान न्यूझीलंडला पेलवलं नाही. इंग्लंडच्या प्रभावी आक्रमणासमोर न्यूझीलंडचा अख्खा डाव 186 धावांमध्ये आटोपला. न्यूझीलंडकडून टॉम लॅथमने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. टॉमव्यतिरिक्त न्यूझीलंडच्या कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. न्यूझीलंडच्या सहा फलंदाजांना दुहेरी धावसंख्यादेखील गाठता आली. नाही. इंग्लंडकडून मार्क वूडने दोन फलंदाजांना माघारी धाडले.

तत्पूर्वी जॉनी बेअरस्टोच्या खणखणीत शतकाच्या जोरावर इंग्लंडने 50 षटकांत आठ बाद 305 धावांचा डोंगर उभारला होता. सलामीवीर जॉनी बेअरस्टोने 99 चेंडूंत 15 चौकार आणि एका षटकारासह 106 धावांची खेळी उभारली. त्याचे यंदाच्या विश्वचषकातले हे दुसरे शतक ठरले. बेअरस्टोसह जेसन रॉयच्या साथीने १२३ धावांची सलामी दिली. रॉयने 60 चेंडूत 60 धावांची खेळी केली. कर्णधार इयॉन मॉर्गननेही 42 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्ट, जीमी निशाम आणि मॅट हेन्रीने प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडले.

गुणतालिका