नवी दिल्ली : वन डे आणि कसोटी क्रिकेटप्रमाणे टी-20 क्रिकेटमध्येही डीआरएस लागू करावा, अशी शिफारस टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने केली आहे.


डीआरएसचा वापर करणं आणि पंचांसोबत गैरवर्तन केल्यानंतर खेळाडूला मैदानातून बाहेर पाठवण्याचा अधिकार पंचांना असावा, असं या समितीने म्हटलं आहे.

एलबीडब्ल्यूच्या अपीलवर पंच निर्णय देणार असतील त्यावेळी कोणतीही टीम आपला डीआरएस गमावणार नाही, असंही एका शिफारसीमध्ये म्हटलं आहे. असं झाल्यास कसोटीतील 80 षटकांनंतरचा टॉप-अप रिव्ह्यू बंद केला जाईल.

समितीने सर्वानुमते कसोटी क्रिकेट टूर्नामेंटला लागू करण्याला पाठिंबा दर्शवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या भविष्यासाठी हा निर्णय महत्वाचा असल्याचं समितीने म्हटलं. तर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतही समितीचं एकमत झालं.