वेलिंग्टन (न्यूझीलंड) : इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटर मोईन अली सध्या भलताच फॉर्ममध्ये आहे. अॅशेज मालिकेती खराब प्रदर्शनानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेत शानदार कामगिरी केली. तसंच सध्या सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही त्याचा फॉर्म चांगला आहे. यामुळे मोईन अलीला असं वाटतं की, तो स्वत:च्या ताकदीवर सामना पालटू शकतो.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मोईन म्हणाला की, 'वनडे क्रिकेटमध्ये मी सलग चांगली गोलंदाजी करतोय. मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केली. मला असं वाटतं की, फक्त विकेट घेऊनच नाही तर चांगल्या लाइन-लेंथवर गोलंदाजी करुन मी माझ्या ताकदीवर सामना पालटू शकतो. जर मी योग्य लाईन-लेंथवर गोलंदाजी केली तर मला नक्कीच विकेट मिळतील.'
सध्या तुफान फॉर्मात असलेल्या मोईन अली अॅशेस मालिकेत फारशी चमक दाखवू शकला नव्हता. त्यामुळे याबाबत तो म्हणाला की, 'वनडे क्रिकेटमुळे मला त्याबाबत फारसा विचार करायला वेळ मिळाला नाही. ती मालिका संपल्यानंतर मी त्या मनस्थितीतून बाहेर आलो. आम्ही खूप जास्त क्रिकेट खेळत आहोत. त्यामुळे मागील मालिकेतील वाईट गोष्टी विसरण्याची गरज असते. तुम्ही जास्त वेळ त्याबाबत विचार करु शकत नाहीत.'
दरम्यान, इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये चौथी कसोटी बुधवारपासून सुरु होणार आहे. या सामन्यात मोईन अली कशी कामगिरी करणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.