बर्मिंगहॅम : चॅम्पियन्स ट्रॉफीत इंग्लंड-ऑस्ट्रेलिया उद्या (शनिवार) भिडणार आहेत. या निमित्तानं इंग्लंडचा ज्यो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर बर्मिंगहॅमच्या रणांगणात पुन्हा आमनेसामने येणार आहेत. त्यामुळं 2013 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान बर्मिंगहॅममध्येच घडलेल्या एका घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
त्या वेळी बर्मिंगहॅमच्या एका बारमध्ये झालेल्या वादातून वॉर्नरनं रूटला एक ठोसा मारला होता. त्यामुळं वॉर्नरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तसंच त्याला दंडही ठोठावण्यात आला होता. चार वर्षांनी पुन्हा बर्मिंगहॅममध्येच रूटच्या समोर उभा ठाकलेला वॉर्नर आता आपण सुधारलो असल्याचं सांगत आहे.
‘त्या घटनेनं आपल्याला खूप काही शिकवलं असल्याचं त्यानं म्हटलं आहे. माझं वय आता चार वर्षांनी वाढलं आहे. त्यामुळं ऐन तारुण्यातला माझा तापट स्वभावही आता निवळला आहे.’ असं वॉर्नरनं सांगितलं. ‘गेल्या चार वर्षांत माझं लग्न झालं. मला दोन मुलंही झाली आहेत. त्यामुळं आपण जबाबदारीनं वागायला लागलो आहे.’ असंही वॉर्नरनं सांगितलं.