Hockey Player Julie Yadav Dies after Road Accident : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरलं आहे. रविवारी सकाळी झालेल्या एका भयानक अपघातात राष्ट्रीय पातळीवरील हॉकीपटू आणि क्रीडा शिक्षिका जूली यादव (Julie Yadav) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौदा मोड परिसरात झाला. गॅस सिलिंडरने भरलेल्या एका अज्ञात डीसीएम ट्रकने जूलीच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.
सिलिंडर भरलेल्या ट्रकने राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूला चिरडलं
अपघातात जूली गंभीर जखमी झाली. त्यामुळे स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून तिला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. सध्या पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला असून, अपघातस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपी वाहन आणि चालकाचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जूली यादव पारा परिसरात राहत होती आणि एलपीएस (LPS) शाळेत स्पोर्ट्स टीचर म्हणून कार्यरत होती. रविवारी सकाळी सुमारे 6:15 वाजता ती शाळेत होणाऱ्या इंटर-स्कूल बॅडमिंटन स्पर्धेसाठी निघाली होती. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर तिला आठवले की ती आपला मोबाईल फोन घरी विसरली आहे. त्यामुळे ती वळून परत जात असताना मौदा मोड येथे ट्रकने तिच्या दुचाकीला चिरडलं.
जूली यादवच्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना धक्का बसला (Hockey Player Julie Yadav Dies after Road Accident)
या भीषण धडकेत जूली गंभीर जखमी झाली आणि काही क्षणांतच तिचा मृत्यू झाला. जूलीचे वडील अजय यादव शेतकरी असून आई गुड्डी देवी गृहिणी आहेत. तिचा धाकटा भाऊ अमन सध्या शिक्षण घेत आहे.
राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू (National level hockey player Julie Yadav)
जूली केवळ क्रीडा शिक्षिका नव्हती, तर ती राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू होती. तिच्या अकाली निधनाने कुटुंबीय, शाळेतील सहकारी आणि संपूर्ण क्रीडा जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे. लखनऊत वाढत्या बेदरकार वाहनचालकांमुळे अशा तरुण प्रतिभांचा जीव जात असल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
हे ही वाचा -
