Heinrich Klassen Viral Video: किरकोळ कमाईतही त्याचा दिखावा करणाऱ्यांची देशासह जगभरात कमी नाही. त्यातही क्रिकेट किंवा बाॅलिवूडची पार्श्वभूमी असल्यास सांगायलाच नको. प्रत्येकाला त्या आलिशान लाईफचा हेवा वाटत असतो. मात्र, कोट्यवधीची कमाई असताना साधेपणा जपणारे सुद्धा शेकडो आहेत. असाच साधेपणा दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
क्लासेनचा रिक्षातून प्रवास
सनरायझर्स हैदराबादचा हेनरिक क्लासेनचा रिक्षातून प्रवास चर्चेचा विषय झाला आहे. हाॅटेलमधून बाहेर पडल्यानंतर क्लासेन आपल्या लेकीसह रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सव्वा पाच कोटींची बोली लावत क्लासेनला हैदराबादने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. इतर लीगमधून क्लासेन खेळत असतो. अशा स्थितीत बक्कळ कमाई असूनही सर्वसामान्य पद्धतीने केलेला प्रवास चर्चेचा विषय झाला आहे. या व्हायरल व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
क्लासेन या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये
दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने (SRH) मुंबई इंडियन्सविरुद्ध (MI) 244 धावांचे मोठे लक्ष्य गाठून आठ चेंडू शिल्लक असताना सहा गडी राखून विजय मिळवला. आयपीएल 2026 हंगामातील हा त्यांचा सलग पाचवा विजय असून, त्यामुळे ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेन यांनी सामन्यात स्फोटक खेळी केली आणि दोघांनीही अर्धशतके झळकावली. क्लासेन या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. अभिषेक शर्मा आणि हेड यांनी पॉवरप्लेमध्ये 92 धावांची धडाकेबाज भागीदारी केली. हेडने 19 चेंडूंमध्ये 48 धावा केल्या, तर अभिषेकने 17 चेंडूंमध्ये 36 धावा केल्या. क्लासेनने 30 डूंमध्ये 7 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 65धावा केल्या. अभिषेकनंतर, क्लासेनने 9 सामन्यांमध्ये 59.14 सरासरीने 414 धावा केल्या आहेत, ज्यामुळे तो या हंगामातील दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. आयपीएलमध्ये एसआरएचसाठी 400 हून अधिक धावा करण्याचा हा क्लासेनचा सलग चौथा हंगाम आहे.
सेहवागचा विक्रम मोडला
क्लासेनने आपल्या स्फोटक खेळीदरम्यान चार उत्तुंग षटकार मारले. यामुळे एसआरएचच्या या फलंदाजाने आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला. सेहवागने 104 डावांमध्ये एकूण 106 षटकार मारले आहेत. मुंबईविरुद्ध चार षटकार मारणाऱ्या क्लासेनने आता सेहवागला मागे टाकले आहे. क्लासेनने 58 सामन्यांच्या 54 डावांमध्ये 107 षटकार मारले आहेत.
टी-20 क्रिकेटमध्ये 350 हून अधिक षटकार
इतकेच नाही, तर हेनरिक क्लासेननेही टी-20 क्रिकेटमध्ये 350 हून अधिक षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. क्लासेनने जगभरातील टी-20 लीगमध्ये 258 सामन्यांच्या 262 डावांमध्ये 359 षटकार मारले आहेत. त्याने इंग्लंडच्या फिल सॉल्टला मागे टाकले आहे, ज्याने 338 सामन्यांच्या 328 डावांमध्ये 358 षटकार मारले आहेत. सॉल्ट या हंगामात आरसीबीकडून खेळत आहे. मात्र, तो गेल्या काही सामन्यांपासून संघाबाहेर आहे. त्याच्या पुनरागमनानंतर त्याला क्लासेनला मागे टाकण्याची संधी मिळेल.
