कॅण्डी : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय फलंदाजांची बॅट तळपली. यामध्ये टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्याने सर्वाधिक आक्रमक शतकी खेळी केली. एका षटकात 26 धावा ठोकून त्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

हार्दिक पंड्याने एका षटकात 26 धावा ठोकल्या. कसोटीमध्ये एका षटकात 26 धावा ठोकणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव आणि संदीप पाटील यांच्या नावावर कसोटीत एका षटकात सर्वाधिक 24 धावा ठोकण्याचा विक्रम होता.

पंड्याने पुष्पकुमाराच्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर सलग दौन चौकार आणि नंतर सलग तीन षटकार ठोकले. अशा एकूण 26 धावा त्याने केवळ 5 चेंडूत पूर्ण केल्या. पंड्याने केवळ 86 चेंडूंमध्येच 100 धावा पूर्ण केल्या.

श्रीलंकेविरुद्ध गॉल कसोटीतून पंड्याने कसोटीत पदार्पण केलं. याच सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी करुन नव्या विक्रमाला गवसणी घातली होती. तर आता कसोटी कारकीर्दीतलं पहिलं शतक त्याने ठोकलं आहे.