नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : 2010 मध्ये भारताला महिलांच्या कुस्तीत पहिलं सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या पैलवान गीता फोगाटने मंगळवारी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला पैलवान गीता फोगाट हिने तिच्या फेसबुक पेजवर तिचे बाळ आणि पती पवन कुमार याच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. तिच्या या गोंडस बाळाचे फोटो पाहून चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. तसेच अनेकांनी तिच्या बाळाचे फोटो शेअर केले आहेत.

गीताने फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, हॅलो बॉय. या जगात तुझं स्वागत आहे. या चिमुकल्या बाळाने आमचं जीवन शानदार बनवलं आहे. स्वतःच्या बाळाला पाहिल्यानंतरच्या भावना व्यक्त करणे अवघड आहे. याला खूप प्रेम आणि आशीर्वाद द्या.

रियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या गीताने काही दिवसांपूर्वी ती प्रेग्नंट असल्याचे सोशल मीडियावरुन शेअर केले होते. तिने त्यावेळी म्हटले होते की, आई झाल्यानंतर ती लवकरच मॅटवर (कुस्तीच्या रिंगणात) परतणार आहे. आता गीता कधीपर्यंत कुस्तीच्या रिंगणात परतणार, हे पाहायचं आहे.