मुंबई : रशियाची टेनिसस्टार मारिया शारापोव्हाला फ्रेन्च ओपनमध्ये थेट वाईल्ड कार्डनं प्रवेश देण्यास आयोजकांनी नकार दिला आहे. फ्रेन्च टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष बर्नार्ड गिडीचेली यांनी शारापोव्हाची वाईल्ड कार्डची विनंती मान्य करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं.
शारापोव्हानं 2012 आणि 2014 साली फ्रेन्च ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. पण वाईल्ड कार्ड हे दुखापतीतून सावरुन पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना दिलं जातं, डोपिंग प्रकरणी बंदीची शिक्षा भोगलेल्या खेळाडूंना नाही, असंही गिडीचेली यांनी स्पष्ट केलं.
शारापोव्हा आणि तिच्या चाहत्यांची निराशा झाली असेल, पण तिच्यासाठी आम्ही कुठली तडजोड करु शकणार नाही, असंही त्यांनी म्हटलं. मेल्डोनियम या प्रतिबंधित औषधाचं सेवन केल्याप्रकरणी 15 महिने बंदीचा कालावधी संपताच शारापोव्हानं गेल्या महिन्यात स्टुटगार्ट ओपनमधून पुनरागमन केलं होतं. पण ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये पुनरागमन करण्यासाठी तिला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
फ्रेन्च ओपनसाठी वाईल्ड कार्ड नाकारलं गेल्यावर काही तासांतच मारिया शारापोव्हावर रोममधील टेनिस स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेण्याची वेळ ओढवली.
रोम ओपनच्या दुसऱ्या फेरीत क्रोएशियाची दिग्गज टेनिसपटू मिर्याना लुसिच बारोनीवर शारापोव्हानं 4-6, 6-3, 2-1 अशी आघाडी घेतली होती. पण डाव्या मांडीला झालेली दुखापत बळावल्यामुळे शारापोव्हाला हा सामना अर्धवट सोडावा लागला. त्यामुळे रोम ओपनची उपांत्य फेरी गाठून विम्बल्डनच्या मुख्य फेरीसाठी थेट पात्र ठरण्याची संधीही शारापोव्हानं गमावली आहे.