मुंबई : क्ले कोर्टचा राजा स्पेनचा राफेल नदाल आणि सर्बियाचा वर्ल्ड नंबर वन नोवाक ज्योकोविचनं फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नदालनं या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची ही आजवरची तेरावी वेळ आहे. तर ज्योकोविच पाचव्यांदा फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.
नदालकडून श्वार्त्झमनचं आव्हान मोडीत
फ्रेंच ओपनच्या पहिल्या उपांत्य सामन्यात राफेल नदालनं अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्त्झमनचा तीन सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवला. नदालने हा सामना 6-3, 6-3, 7-6 असा एकतर्फी जिंकला. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान नदालनं एकही सेट न गमावता स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
ज्योकोविचची त्सिसिपासवर मात
यंदाच्या फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ज्योकोविचची गाठ पडली ती ग्रीसच्या स्टेफानोस त्सिसिपासशी. ज्योकोविचन सामन्यात पहिले दोन सेट्स 6-3, 6-2 असे आरामात जिंकले. पण त्सिसिपासनं पुढचे दोन्ही सेट्स जिंकून ज्योकोविचसमोर आव्हान निर्माण केलं. पण ज्योकोविचनं आपला सगळा अनुभव पणाला लावून अखेरचा सेट 6-1 असा जिंकला आणि सामनाही खिशात घातला.
नदाल विजेतेपदाची मालिका कायम राखणार?
राफेल नदालनं गेल्या पंधरा वर्षात फ्रेंच ओपनमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. 2005 पासून नदालनं 12 वेळा फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली आहे. आणि या बाराही वेळा त्यानं विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. त्यामुळे नदाल यंदाही ती परंपरा कायम राखणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
ज्योकोविचला दुसऱ्या विजेतेपदाची संधी
नोवाक ज्योकोविचनं क्ले कोर्टवरच्या या लढाईत याआधी तीन वेळा अंतिम फेरी गाठली आहे. पण 2016 साली अँडी मरेला हरवून ज्योकोविचनं एकदाच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. तर दोन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे.
ग्रँड स्लॅम विजेतेपदांची शर्यत
राफेल नदालनं आजवरच्या कारकीर्दीत 19 ग्रँड स्लॅम विजेतीपदं पटकावली आहेत. त्यापाठोपाठ ज्योकोविचनंही 17 ग्रँड स्लॅम विजेतीपदांवर आपलं नाव कोरलंय. त्यामुळे ग्रँड स्लॅम विजेतीपदांच्या शर्यतीतली चुरस आणखी वाढणार आहे. या शर्यतीत स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर 20 विजेतेपदांसह आघाडीवर आहे.