Portugal vs Croatia Highlights FIFA World Cup 2026 Knockout : फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये टोरंटो येथे झालेल्या एका अत्यंत चुरशीच्या आणि ऐतिहासिक सामन्यात पुर्तगालने क्रोएशियाचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीत धडक मारली आहे. या विजयानंतर क्रिस्टियानो रोनाल्डो आणि संपूर्ण पुर्तगाली संघ भावुक झालेला पाहायला मिळाला. सामना संपताच रोनाल्डोने त्याचा दिवंगत डिओगो जोटा याची 21 नंबरची जर्सी परिधान केली आणि डोळ्यात अश्रू आणून आकाशाकडे बोट दाखवत हा विजय त्याला समर्पित केला.

Continues below advertisement

डिओगो जोटाच्या आठवणीत संघ झाला भावुक (Cristiano Ronaldo Why Wearing 21 No Jersey)

Continues below advertisement

या भावनिकतेमागचे कारण म्हणजे, येत्या शुक्रवारी डिओगो जोटा आणि त्याचा भाऊ आंद्रे सिल्वा यांच्या कार अपघातातील निधनाला ठीक एक वर्ष पूर्ण होत आहे. जोटाने पुर्तगालसाठी 49 सामने खेळले होते आणि 14 गोल डागले होते. संपूर्ण संघाने मैदानाच्या मध्यभागी उभे राहून जोटाचे स्मरण केले.

सामन्यानंतर 'फॉक्स'शी बोलताना रोनाल्डो म्हणाला की, "आम्हाला सामना सुरू होण्यापूर्वीच माहित होतं की हा क्षण आमच्यासाठी किती खास आहे. आज आम्ही जिंकलो यापेक्षा ज्या पद्धतीने जिंकलो ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आम्हाला माहित आहे की जोटा आमच्यासोबतच आहे आणि त्याला आदरांजली वाहण्यासाठी आज जिंकणे हाच एकमेव पर्याय होता."

41 व्या वर्षी गोल करत रोनाल्डोचा नवा जागतिक विक्रम!

सामन्यात सुरुवातीला क्रोएशियाच्या इवान पेरिसिकने गोल केल्यामुळे पुर्तगाल 1-0 ने मागे पडला होता. परंतु, 68 व्या मिनिटाला पुर्तगालला पेनल्टी मिळाली, ज्यावर क्रिस्टियानो रोनाल्डोने कोणताही चूकीचा शॉट न मारता थेट गोल डागला. रोनाल्डोच्या कारकिर्दीतील फिफा वर्ल्ड कप नॉकआउट स्टेजमधील हा पहिलाच गोल आहे. या वयात गोल करून रोनाल्डो पुरुष विश्वचषक नॉकआउट सामन्यात गोल करणारा इतिहासातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. यानंतर, सामन्याच्या इंजरी टाईममध्ये गोंसालो रामोसने पुर्तगालसाठी विजयी गोल केला.  

व्हीएआर (VAR) वाद आणि पुर्तगालचा विजय

या सामन्याचा शेवट प्रचंड नाट्यमय आणि वादाने झाला. सामन्याच्या अगदी शेवटच्या सेकंदात क्रोएशियाच्या मारियो पसालिकने गोल करून स्कोअर 2-2 असा बरोबरीत आणला होता. मात्र, VAR रिव्ह्यू नंतर पसालिकला ऑफसाइड घोषित करण्यात आले. त्यामुळे क्रोएशियाचा तो गोल रद्द झाला आणि पुर्तगालने 2-1 ने सामना खिशात घातला. राउंड ऑफ 32 ची ही कठीण परीक्षा पार केल्यानंतर, आता पुर्तगालचा संघ सोमवार, टेक्सासमधील अर्लिंग्टन येथे होणाऱ्या हाय-व्होल्टेज राउंड ऑफ 16 च्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी स्पेनचा सामना करेल.

हे ही वाचा - 

FIFA World Cup 2026 : रेफरीच्या एका निर्णयाने फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठा राडा! क्रोएशियाचं स्वप्न चक्काचूर, शेवटच्या सेकंदाला रोनाल्डोची पोर्तुगाल जिंकली, नेमकं काय घडलं?