Mexico City FIFA World Cup 2026 : दोन गोल, सेलिब्रेशनसाठी रस्त्यावर 10 लाख चाहते अन् 3 जणांचा मृत्यू! ऐतिहासिक विजयानंतर मेक्सिकोत काय घडलं?
Mexico City FIFA World Cup 2026 : मेक्सिको सिटीच्या रस्त्यांवर लाखो चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत आणि गुदमरल्यामुळे काही निष्पाप चाहत्यांचा मृत्यू झाला आहे.

Mexico City FIFA World Cup 2026 celebrations Three Die : सध्या फिफा वर्ल्ड कप 2026 (FIFA World Cup 2026) चा थरार जगभरात पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतील राउंड ऑफ 32 च्या एका सामन्यात मेक्सिकोच्या संघाने इक्वाडोरवर 2-0 असा ऐतिहासिक विजय नोंदवला. या अविस्मरणीय विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण होते. मात्र, या विजयाचा जल्लोष साजरा करत असतानाच एक दुर्दैवी घटना घडली आहे. मेक्सिको सिटीच्या रस्त्यांवर लाखो चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत आणि गुदमरल्यामुळे 3 निष्पाप चाहत्यांचा मृत्यू झाला आहे.(Mexico beats Ecuador 2-0 in World Cup knockout stage)
नेमकी कुठे आणि कशी घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, एस्टाडिओ अझ्टेका मैदानावर मेक्सिकोने इक्वाडोरचा पराभव करताच चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मेक्सिकोने राउंड ऑफ 16 मध्ये दणक्यात प्रवेश केल्याच्या आनंदात पासेओ डे ला रिफॉर्मा आणि आसपासच्या परिसरात तब्बल 10 लाखांपेक्षा अधिक फुटबॉल चाहते रस्त्यावर उतरले. मेक्सिको सिटीचे ऐतिहासिक प्रतीक असलेल्या एंजेल ऑफ इंडिपेंडन्स स्मारकासमोरील संपूर्ण परिसराला मानवी समुद्राचे स्वरूप आले होते.
हॅम्बर्गो आणि लँकेस्टर रस्त्यांवर गर्दीचा दाब इतका वाढला की, लोकांना श्वास घेणे कठीण झाले. या प्रचंड गर्दीत गुदमरल्यामुळे तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतकांमध्ये एका 44 वर्षीय पुरुषाचा आणि दोन महिलांचा (वय 19 आणि 48 वर्षे) समावेश आहे. स्थानिक प्रशासनाने बुधवार रोजी या दुःखद घटनेला अधिकृत दुजोरा दिला आहे.
40 वर्षांनंतर रचला इतिहास, पण आनंदावर विरजण
मेक्सिकोच्या संघाने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली होती. यापूर्वी 1986 मध्ये मेक्सिकोने स्वतःच्या यजमानपदाखाली वर्ल्ड कपच्या बाद फेरीत बुल्गारियाचा पराभव केला होता. त्यानंतर तब्बल 40 वर्षांनी मेक्सिकोने नॉकआउट सामन्यात विजय मिळवून नवा इतिहास रचला. संपूर्ण देश या ऐतिहासिक क्षणाचा उत्सव साजरा करत असतानाच, या मृत्यूच्या बातमीने आनंदाच्या जल्लोषावर विरजण पडले आणि उत्सवाचे रूपांतर शोकाकुळ वातावरणात झाले.
मेक्सिको सिटीच्या प्रमुखांनी व्यक्त केले दुःख
या हृदयद्रावक दुर्घटनेनंतर मेक्सिको सिटी सरकारच्या प्रमुख क्लारा ब्रुगाडा मोलिना यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत दुःख व्यक्त केले आणि अधिकृत निवेदन जारी केले. "स्थानिक आरोग्य सेवांच्या अहवालानुसार, पासेओ डे ला रिफॉर्माजवळ तीन लोक बेशुद्ध पडल्याची माहिती मिळताच मेक्सिको सिटीच्या आपत्कालीन पथकांनी त्वरित धाव घेतली. सर्व वैद्यकीय प्रोटोकॉल सक्रिय करण्यात आले होते, परंतु दुर्दैवाने त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. मी अत्यंत जड अंतःकरणाने त्यांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करते. आम्ही नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की, कोणताही उत्सव साजरा करताना नेहमी जबाबदारी, काळजी आणि सहानुभूती बाळगावी."
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या























