FIFA World Cup 2026 In America : फीफा विश्वचषक 2026 च्या उद्घाटनाला अवघे काही दिवस बाकी असताना अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा (England Football Team) बेस कॅम्प असलेल्या कॅन्सस सिटी परिसरात अंधाधुंद गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत 9 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, सुदैवाने कोणाचाही मृत्यू झालेला नाही.

Continues below advertisement

इंग्लंडच्या बेस कॅम्पपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर गोळीबार

कॅन्सस सिटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ज्या ठिकाणी गोळीबार झाला ते ठिकाण इंग्लंड संघाच्या नियोजित बेस कॅम्पपासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. विशेष म्हणजे, इंग्लंड संघासाठी राखीव असलेले हॉटेलही घटनास्थळापासून फार दूर नव्हते.

Continues below advertisement

गोळीबाराचा आवाज ऐकताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि नागरिकांची पळापळ सुरू असल्याचे दिसून आले. सुरुवातीला तीन महिलांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, नंतरच्या तपासात आणि चेंगराचेंगरीमुळे जखमींची संख्या वाढून 9 वर पोहोचल्याचे स्पष्ट झाले.

इंग्लंडचा संघ त्या वेळी कॅन्सस सिटीत नव्हता

या घटनेमुळे इंग्लंडच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली असली तरी संघ सध्या कॅन्सस सिटीत उपस्थित नव्हता. इंग्लंडचे खेळाडू सध्या फ्लोरिडातील पाम बीच येथे विश्वचषकाच्या तयारीसाठी सराव शिबिरात सहभागी झाले आहेत. संघ 13 जून रोजी कॅन्सस सिटीत दाखल होणार आहे. त्यामुळे या घटनेचा खेळाडूंवर थेट परिणाम झाला नसला तरी सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.

पोलिसांचा तपास सुरू, अद्याप कुणालाही अटक नाही

कॅन्सस सिटी पोलिस विभागाने सांगितले की, घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरात गस्त वाढवण्यात आली असून, संशयितांचा शोध सुरू आहे. मात्र, बातमी लिहेपर्यंत या प्रकरणात कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नव्हते. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

विश्वचषकापूर्वी इंग्लंडचा आत्मविश्वास वाढलेला

दरम्यान, विश्वचषकाच्या तयारीत इंग्लंड संघाने नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात न्यूझीलंडचा 1-0 असा पराभव केला आहे. आता संघाचा पुढील सराव सामना कोस्टा रिकाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर इंग्लंडचा ताफा कॅन्सस सिटीकडे रवाना होईल. फीफा विश्वचषक 2026 दरम्यान कॅन्सस सिटी हेच इंग्लंड संघाचे अधिकृत बेस कॅम्प असणार आहे. त्यामुळे या गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आयोजक आणि स्थानिक प्रशासनावर अधिक जबाबदारी येणार आहे.

हे ही वाचा -

IND vs PAK सामन्याआधीच 'नो हँडशेक' वादात नवा ट्विस्ट! पाकिस्तानी कर्णधारासोबत जय शाह यांचे हस्तांदोलन; नेमकं घडलं तरी काय?