Fifa World Cup Argentina vs Brazil : फुटबॉल विश्वात अनेक संघ एकमेकांसमोर ठाकतात, पण जेव्हा पिवळी-हिरवी (ब्राझील) आणि पांढरी-निळी (अर्जेंटिना) जर्सी समोरासमोर येते, तेव्हा संपूर्ण जगाचा श्वास रोखला जातो. क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची जी क्रेझ आहे, तीच किंवा त्याहूनही अधिकची फुटबॉलमध्ये ब्राझील विरुद्ध अर्जेंटिना सामन्यात पाहायला मिळते. ही केवळ दोन देशांमधील स्पर्धा नाही, तर ती फुटबॉलचा वारसा आणि खंडातील वर्चस्वाची महालढाई आहे. फुटबॉल जगताला वेड लावणाऱ्या याच सामन्याला 'सुपरक्लासिको डी लास अमेरिका' (Superclásico de las Américas) असे म्हटले जाते.
फुटबॉलमधील सर्वात मोठे वैर (Fifa World Cup Argentina vs Brazil Head to Head)
ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन्ही संघ फुटबॉल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी आहेत. या दोन्ही देशांतील चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असतो आणि मैदानावर खेळाडू विजयासाठी अक्षरशः जीव ओतून खेळतात. एका बाजूला लिओनेल मेस्सी सारखा दिग्गज खेळाडू तर दुसऱ्या बाजूला नेमार ज्युनियर. यासारखा स्टार फुटबॉलर असल्यामुळे प्रत्येक सामना जगभरातील कोट्यवधी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो.
FIFA विश्वचषकात कोणाचा वरचष्मा?
फिफा विश्वचषकाच्या इतिहासात, हे दोन दिग्गज केवळ चार वेळा आमनेसामने आले आहेत. या सामन्यांमध्ये ब्राझीलचे पारडे किंचित जड राहिले आहे. त्यांनी दोन सामने (1974 आणि 1982) जिंकले, तर 1978चा सामना 0-0 असा बरोबरीत संपला. या चार सामन्यांमध्ये ब्राझीलने दोन सामने जिंकले, अर्जेंटिनाने एक सामना जिंकला, तर एक सामना अनिर्णित राहिला.
1990 चा तो ऐतिहासिक अन् वादग्रस्त सामना
1990 च्या इटलीमध्ये झालेल्या फिफा विश्वचषकात (World Cup), बाद फेरीत (Round of 16) अर्जेंटिना आणि ब्राझील हे दोन कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आले होते. मैदानावरील त्यांच्यातील वैर जगजाहीर आहे. सामन्यात ब्राझीलचे वर्चस्व दिसत होते, पण अंतिम क्षणांमध्ये महान खेळाडू डिएगो माराडोना याने आपल्या जादूई खेळाचे प्रदर्शन करत एक अप्रतिम पास दिला. या पासवर क्लाउडिओ कॅनिगिया याने गोल केला आणि अर्जेंटिनाने हा सामना 1-0 असा जिंकून ब्राझीलला विश्वचषकातून बाहेर काढले.
काय होता तो Holy Water Scandal?
सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर एक वेगळाच वाद सुरू झाला, ज्याने फुटबॉल जगताला हादरवून सोडले. ब्राझीलचा खेळाडू ब्रँको याने आरोप केला की, सामन्यादरम्यान जेव्हा खेळ थांबला होता, तेव्हा त्याने अर्जेंटिनाच्या मेडिकल स्टाफने दिलेल्या बाटलीतील पाणी प्यायले होते. ब्रँकोच्या मते, ते पाणी प्यायल्यानंतर त्याला अचानक चक्कर आल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे त्याला मैदानात नीट धावताही येत नव्हते. त्याचा असा संशय होता की त्या पाण्यात काहीतरी अंमली किंवा गुंगी आणणारे औषध (Tranquilizers) मिसळले होते.
माराडोनाचा खळबळजनक खुलासा!
अनेक वर्षे अर्जेंटिनाचे अधिकारी या आरोपांना नकार देत राहिले. पण एका टीव्ही शोमध्ये बोलताना डिएगो माराडोनाने स्वतः कबुली दिली की, त्या सामन्यात ब्राझीलच्या खेळाडूंना देण्यासाठी एका खास बाटलीमध्ये गुंगीचे औषध (Royhypnol) मिसळण्यात आले होते. माराडोनाने हसत हसत सांगितले की, जेव्हा ब्रँको पाणी पिण्यासाठी आला, तेव्हा त्याला नेमकी तीच खास बाटली देण्यात आली. माराडोनाच्या या खुलाशानंतर ब्राझीलमध्ये प्रचंड संताप व्यक्त झाला. ब्रँकोने तर अर्जेंटिनाच्या फुटबॉल असोसिएशनवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, अर्जेंटिनाच्या तत्कालीन प्रशिक्षकांनी (कार्लोस बिलाडो) आणि फुटबॉल बोर्डाने माराडोनाचा हा दावा नेहमीच फेटाळून लावला आणि ती माराडोनाची फक्त एक मस्करी असल्याचे सांगितले.
हेड-टू-हेड आकडेवारी
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 110 हून अधिक अधिकृत सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये ब्राझील 43 सामने जिंकला, तर अर्जेंटिना संघाने 41 सामन्यात विजय मिळावला. तसेच बरोबरी 26 सामने सुटले. या आकडेवारीवरून दोन्ही संघांमध्ये किती जबरदस्त स्पर्धा आहे याचा अंदाज येतो. अर्जेंटिनाने विक्रमी 16 वेळा कोपा अमेरिका जिंकला आहे, तर ब्राझीलने नऊ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. 2021 च्या कोपा अमेरिका अंतिम सामन्यात, अर्जेंटिनाने ब्राझीलला त्यांच्याच देशात 1-0ने हरवून विजेतेपद पटकावले. हा विजय मेस्सीच्या कारकिर्दीतील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक मानला जातो.
पेले विरुद्ध माराडोना
पेले आणि डिएगो माराडोना हे फुटबॉल इतिहासातील दोन महान खेळाडू आहेत. पेले यांनी ब्राझीलला तीन विश्वचषक जिंकून दिले, तर माराडोनाने 1986 मध्ये जवळपास एकहाती अर्जेंटिनाला विश्वविजेते बनवले. दोघे कधीही एकमेकांविरुद्ध खेळले नाहीत, तरी सर्वकालीन महान खेळाडू कोण? या चर्चेमुळे ब्राझील-अर्जेंटिना प्रतिस्पर्धेला आणखी धार मिळाली.
आता, फुटबॉलमध्ये लिओनेल मेस्सी आणि नेमार जूनियर यांची तुलना वारंवार केली जाते. दोघेही क्लब फुटबॉलमध्ये मित्र राहिले. मात्र देशासाठी मैदानात उतरल्यावर दोघांनीही विजयासाठी सर्वस्व पणाला लावले. 2021 च्या कोपा अमेरिका अंतिम सामन्यानंतर पराभूत झालेल्या नेमारला मेसीने मिठी मारल्याचा फोटो जगभर व्हायरल झाला होता. तो खेळभावनेचा सर्वोत्तम नमुना मानला जातो.
हे ही वाचा -
