11 जून 2026 पासून अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांच्या संयुक्त यजमानपदाखाली फुटबॉलच्या सर्वात मोठ्या महाकुंभाला अर्थात फीफा वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. ब्राझीलपासून जर्मनीपर्यंत, अर्जेंटिनापासून फ्रान्सपर्यंत जगभर फुटबॉलचं वातावरण चांगलच तापलं आहे. मात्र भारतात चित्र काहीसे वेगळं आहे कारण इथं अजूनही क्रिकेटच चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. भारतीय संघाची मालिका, आयपीएलचे स्टार्स आणि क्रिकेटमधील घडामोडी यांनाच अधिक महत्त्व दिले जाते. मग प्रश्न असा पडतो की, जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ असलेला फुटबॉल भारताच्या हृदयावर राज्य करण्यात का अपयशी ठरला?  

Continues below advertisement

भारताची फुटबॉल परंपरा खूप जुनी...

अनेकांना वाटते की फुटबॉल भारतात फारसा कधी लोकप्रिय नव्हता. पण वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे. भारतीय फुटबॉलचा इतिहास समृद्ध आहे. 1911 मध्ये मोहन बागानने IFA शिल्डच्या अंतिम सामन्यात ब्रिटिश ईस्ट यॉर्कशायर रेजिमेंटचा पराभव केला होता. विशेष म्हणजे भारतीय खेळाडू अनवाणी पायांनी खेळले होते. या विजयाकडे स्वातंत्र्यलढ्यातील मानसिक विजय म्हणूनही पाहिले जाते. भारताने 1950 च्या फीफा वर्ल्ड कपसाठी पात्रताही मिळवली होती. मात्र विविध कारणांमुळे भारतीय संघाने स्पर्धेतून माघार घेतली. त्यानंतर 1951 आणि 1962 च्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले, तर 1956 च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली. त्या काळात मोहन बागान, ईस्ट बंगाल आणि हैदराबाद सिटी पोलिस यांसारख्या क्लब्सच्या सामन्यांना लाखो चाहते उपस्थित राहत असत. म्हणजेच फुटबॉलची मुळे भारतीय भूमीत खूप खोलवर रुजलेली होती.

Continues below advertisement

1983 चा तो विजय, ज्याने भारतीय क्रीडा क्षेत्रात मोठे बदल

25 जून 1983... लॉर्ड्सचे ऐतिहासिक मैदान... आणि कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करून क्रिकेट विश्वचषक जिंकला. हा फक्त एक क्रीडा विजय नव्हतास, तो नव्या भारताच्या आत्मविश्वासाचा जन्म होता. त्या काळात देशात दूरदर्शनचा प्रसार वाढत होता. 1982 च्या आशियाई क्रीडा स्पर्धांनंतर रंगीत टीव्ही घराघरात पोहोचू लागले होते. विश्वचषक विजयाचे दृश्य पुन्हा-पुन्हा दाखवले गेले. त्यानंतर 1985 मधील वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेटमधील यशामुळे क्रिकेटपटू लोकांच्या नजरेत सुपरस्टार बनले. दुसरीकडे फुटबॉल मात्र हळूहळू मागे पडत गेला.

क्रिकेट खेळणे सोपे, फुटबॉलसाठी लागते मैदान

भारतात क्रिकेट लोकप्रिय होण्यामागचे एक मोठे कारण म्हणजे त्याची सहज उपलब्धता. तीन विटा, एक बॅट आणि एक टेनिस बॉल मिळाला की क्रिकेट सुरू होते. गल्लीत, सोसायटीत, मोकळ्या जागेत किंवा रस्त्यावरही क्रिकेट खेळता येते. मात्र फुटबॉलसाठी मोठ्या मैदानाची गरज असते. शहरांमध्ये अशी मैदाने कमी होत गेली. त्यामुळे मुलांना लहानपणापासून क्रिकेटशी अधिक जवळीक निर्माण झाली. आपण रोज जो खेळ खेळतो, त्याच्याशी आपले नाते अधिक घट्ट होत जाते आणि क्रिकेटने ही संधी पूर्णपणे साधली.

पैसा, सुविधा आणि स्टार क्रिकेटच्या बाजूने गेली...

1990 नंतर भारतात आर्थिक उदारीकरण झाले. खासगी टीव्ही वाहिन्या आल्या. विदेशी क्रिकेट मालिकांचे थेट प्रक्षेपण सुरू झाले. याच काळात सचिन तेंडुलकरसारखा सुपरस्टार उदयास आला. त्यानंतर सौरव गांगुली, राहुल द्रविड, एम.एस. धोनी आणि विराट कोहली यांसारख्या खेळाडूंनी क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर नेले. जाहिरातदारांनी क्रिकेटमध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली. आयपीएलच्या आगमनानंतर क्रिकेट हा केवळ खेळ राहिला नाही, तर तो एक भव्य मनोरंजन उद्योग बनला. फुटबॉलला मात्र अशी आर्थिक ताकद किंवा सातत्यपूर्ण माध्यम प्रसिद्धी मिळाली नाही.

क्रिकेटने भारतीयांना केवळ विजयच दिले नाहीत, तर राष्ट्रीय एकात्मतेचे व्यासपीठही दिले. भारत-पाकिस्तान सामना असो, 2011 चा विश्वचषक असो किंवा एखादी ऐतिहासिक कसोटी मालिका असो, संपूर्ण देश एकाच भावनेने जोडला जातो. फुटबॉल मात्र दीर्घकाळ पश्चिम बंगाल, केरळ, गोवा आणि ईशान्य भारतापुरता मर्यादित राहिला. उत्तर भारतात क्रिकेट, कबड्डी आणि कुस्ती यांचे वर्चस्व कायम राहिले. याशिवाय भारतीय फुटबॉल संघ जागतिक स्तरावर मोठे यश मिळवू शकला नाही. जेव्हा आपला देश जगातील सर्वोच्च स्पर्धांमध्ये दिसत नाही, तेव्हा त्या खेळाबद्दलची राष्ट्रीय पातळीवरील भावनिक गुंतवणूकही कमी राहते.

भारतात क्रिकेट आणि फुटबॉलचे चाहते किती?

आज भारतात क्रिकेटचे चाहते सुमारे 55 ते 57 कोटी असल्याचे विविध अहवालांमध्ये नमूद केले जाते. म्हणजे देशातील जवळपास प्रत्येक दुसरा व्यक्ती क्रिकेटशी जोडलेला आहे. त्याच्या तुलनेत फुटबॉलचे चाहते 7 ते 8 कोटींच्या आसपास आहेत. ही संख्या वाढत असली तरी क्रिकेटच्या तुलनेत अजूनही खूपच कमी आहे. विशेषतः ग्रामीण भारतात क्रिकेटची पोहोच जवळपास प्रत्येक गावापर्यंत आहे. फुटबॉल अजूनही प्रामुख्याने शहरी भाग आणि काही विशिष्ट राज्यांपुरताच मर्यादित आहे.

तरीही फुटबॉलचे भविष्य आशादायी

आजची तरुण पिढी यूट्यूबवर लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डोचे गोल पाहते. इंग्लिश प्रीमियर लीग, ला लिगा आणि चॅम्पियन्स लीगचे सामने नियमितपणे फॉलो करते. सुनील छेत्री, संदेश झिंगन आणि बाला देवी यांसारख्या भारतीय खेळाडूंनी नव्या पिढीला प्रेरणा दिली आहे. इंडियन सुपर लीगमुळे फुटबॉल आता कोलकाता किंवा गोवापुरता मर्यादित राहिलेला नाही; मुंबई, बेंगळुरू, जमशेदपूरसारख्या शहरांमध्येही त्याचा प्रभाव वाढत आहे. हे ही वाचा -

FIFA World Cup : 1950 मधील पूर्वजांची एक चूक अन् देशाच्या फुटबॉलचा इतिहास बदलला, ज्यामुळे भारताला पुन्हा कधीच खेळता आला नाही FIFA वर्ल्ड कप! नेमकं काय घडलं होतं?