Cristiano Ronaldo Retirement : फिफा वर्ल्ड कपनंतर रोनाल्डो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला ठोकणार रामराम; बहिणीने सांगितलं ही निरोपाची वेळ, फुटबॉल जगतात खळबळ, CR7 काय म्हणाला?
Cristiano Ronaldo Retirement Plan Confirmed By Sister : फुटबॉल जगतातील महान खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो चालू विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Cristiano Ronaldo Retirement Plan Confirmed By Sister : फुटबॉल जगतातील महान खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो चालू विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. रोनाल्डोची बहीण कालिया अवेरो (Katia Aveiro) हिने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जेव्हा रोनाल्डो या विश्वचषकात आपला शेवटचा सामना खेळेल, तेव्हा त्याच्या दोन दशकांच्या प्रदीर्घ आणि ऐतिहासिक कारकिर्दीचा शेवट होईल. मँचेस्टर युनायटेडमधील एक युवा, चपळ खेळाडू ते जगातील सर्वोत्कृष्ट गोलस्कोअरर बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. आता या महान प्रवासाचा शेवटचा अध्याय जवळ आला आहे. दरम्यान, फिफा विश्वचषक 2026 च्या राउंड ऑफ 32 च्या थरारक सामन्यात पोर्तुगालने क्रोएशियाचा 2-1 असा पराभव करत राउंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यानंतर रोनाल्डोने आपल्या निवृत्तीच्या चर्चांवर एक गूढ विधान केले, ज्यामुळे सस्पेन्स आणखी वाढला आहे.
Cristiano Ronaldo continues to break records at @FIFAWorldCup 2026 👏🇵🇹 pic.twitter.com/4Dd7xIj2dR
— FIFA (@FIFAcom) July 3, 2026
बहिणीने केला निवृत्तीचा दावा
रोनाल्डोची बहीण कालिया अवेरो हिने म्हटले की, "मला एका अत्यंत विश्वासू सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा रोनाल्डोचा शेवटचा प्रवास आहे. त्यामुळे आपण सर्वांनी याचा आनंद घेतला पाहिजे. तो आजच निरोप घेईल असे मला वाटत नाही, पण तो वेळ आता जवळ आला आहे. मला पूर्ण खात्री आहे की हीच निरोपाची वेळ आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर 200 हून अधिक गोल करणाऱ्या खेळाडूला शोधणे भविष्यात खूप कठीण असेल."
रोनाल्डोचे सस्पेन्स वाढवणारे विधान
बहिणीच्या दाव्याच्या उलट, रोनाल्डोने स्पष्ट केले की त्याने अद्याप आपल्या भविष्याबद्दल कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यानंतर तो म्हणाला: "मी घाईघाईने कोणताही निर्णय घेत नाही. मी काय तो निर्णय हा वर्ल्ड कप संपल्यानंतरच घेईन, आता नाही." क्रोएशियाविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात पोर्तुगाल मागे पडला होता, परंतु रोनाल्डोने पेनल्टीवर गोल करत संघाला कमबॅक करून दिले. हा त्याचा फिफा विश्वचषक बाद फेरीतील पहिलाच गोल ठरला. त्यानंतर सामन्याच्या अंतिम मिनिटांत गोंकालो रामोसने गोल करत पोर्तुगालला 2-1 असा विजय मिळवून दिला आणि राउंड ऑफ 16 चे तिकीट पक्के केले, जिथे आता त्यांचा सामना स्पेनशी होणार आहे.
रोनाल्डोची ऐतिहासिक अन् थक्क करणारी कारकीर्द
पाच वेळा प्रतिष्ठित 'बॅलन डी'ओर' (Ballon d'Or) पुरस्कार जिंकणाऱ्या रोनाल्डोने या विश्वचषकात आतापर्यंत 3 गोल केले आहेत. याशिवाय त्याच्या नावावर अनेक मोठे रेकॉर्ड्स नोंदवले गेले आहेत. तो 41 वर्षे आणि 147 दिवस वयाचा असताना विश्वचषक बाद फेरीचा सामना खेळणारा इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. जगातील 6 वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये गोल करणारा तो पहिला पुरुष फुटबॉलपटू आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली पोर्तुगालने 2016 मध्ये 'युरो कप' आणि दोनदा (2018-19 आणि 2024-25) 'UEFA नेशन्स लीग'चे विजेतेपद पटकावले. तो पोर्तुगालसाठी सर्वाधिक सामने खेळणारा आणि सर्वाधिक गोल करणारा कर्णधार आहे.
क्लब फुटबॉल खेळणे राहणार सुरू
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झाल्यास रोनाल्डो पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघाकडून खेळणे थांबवेल. मात्र, तो सौदी अरेबियाच्या 'अल-नासर' (Al-Nassar) या क्लबसाठी व्यावसायिक फुटबॉल खेळणे सुरूच ठेवणार आहे. आपल्या कारकिर्दीत 1,000 गोल पूर्ण करण्याचे त्याचे एक मोठे उद्दिष्ट असून, ते पूर्ण करण्यासाठी तो क्लब फुटबॉल खेळत राहील.
हे ही वाचा -























