FIFA World Cup 2026 Controversy : फिफा वर्ल्ड कप 2026 (FIFA World Cup 2026) च्या थराराला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच याच्या आयोजनावर आणि व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. अमेरिकेच्या कडक नियमांमुळे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे संपूर्ण फुटबॉल जगतात खळबळ उडाली आहे. आफ्रिकेतील नंबर-1 फुटबॉल रेफरी ओमर अब्दुलकादिर अर्टान यांना मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच अमेरिकन अधिकाऱ्यांनी देशात प्रवेश देण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर त्यांना तातडीने इस्तंबूलला जाणाऱ्या विमानाने परत मायदेशी धाडले. धक्कादायक बाब म्हणजे अर्टान हे राजनैतिक (Diplomatic) पासपोर्टवर प्रवास करत होते. सुरुवातीच्या विलंबांनंतर नैरोबीमधील सोमाली दूतावासाने त्यांना व्हिसा मिळवून देण्यासाठी मदतही केली होती, तरीही अमेरिकन बॉर्डर कंट्रोलने त्यांना देशात प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला.
ओमर अब्दुलकादिर अर्टान यांना का डिपोर्ट करण्यात आले? (Africa's Best referee Omar Abdulkadir Artan denied entry to USA)
'यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन'ने या पुरस्कार विजेत्या रेफरीला परत पाठवण्यामागचे कोणतेही अधिकृत कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, हा संपूर्ण प्रकार राजकीय आणि अमेरिकेच्या निर्बंधांशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेने सोमालियासह अनेक पूर्व आफ्रिकी आणि मध्य पूर्वेतील देशांवर कडक प्रवास बंदी घातली आहे. सध्याच्या नियमांनुसार, सोमाली नागरिकांना अमेरिकन व्हिसा मिळण्यावर जवळपास पूर्णपणे बंदी आहे. केवळ अमेरिकेचे राष्ट्रीय हित किंवा विशेष राजनैतिक कार्य असेल तरच यात अपवाद दिला जातो. 2018 मध्ये फिफा-लिस्टेड रेफरी बनलेले अर्टान हे आफ्रिकेतील सर्वोत्तम रेफरी मानले जातात. त्यांनी 2026 मध्ये अनेक मोठ्या 'CAF चॅम्पियन्स लीग' सामन्यांचे यशस्वी संचालन केले आहे. आफ्रिकेतील सर्वोत्तम रेफरींपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या प्रतिष्ठित अधिकाऱ्याला प्रवेश नाकारल्याने फुटबॉल विश्वात खळबळ उडाली आहे.
वर्ल्ड कपमध्ये व्हिसाचा मोठा गोंधळ
अर्टान हे अमेरिकेच्या या कडक धोरणांचे बळी ठरलेले एकमेव व्यक्ती नाहीत. या वर्ल्ड कपमध्ये व्हिसावरून प्रचंड गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे. 'इंटरनॅशनल स्पोर्ट्स प्रेस असोसिएशन'ने फिफाकडे अधिकृत तक्रार केली आहे की, आफ्रिकन आणि इराणी क्रीडा पत्रकारांचे व्हिसा अर्ज कोणत्याही ठोस कारणाशिवाय फेटाळण्यात आले आहेत. याशिवाय, सुरक्षा तपासणीचे कारण पुढे करत इराणच्या राष्ट्रीय संघाच्या अधिकृत फोटोग्राफरलाही अमेरिकेत येण्यापासून रोखण्यात आले आहे.
'सिंगल-एंट्री व्हिसा'मुळे संघांची डोकेदुखी वाढली
हा वर्ल्ड कप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जात आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन अधिकाऱ्यांनी जारी केलेले 'सिंगल-एंट्री व्हिसा' (Single-entry visa) अनेक संघांसाठी मोठा मनस्ताप ठरत आहेत. ग्रुप स्टेजच्या गुंतागुंतीच्या वेळापत्रकामुळे अनेक देशांना प्रवासाच्या नियोजनात (Logistics) मोठ्या अडचणी येत आहेत.
स्पर्धेतील सामने अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होणार असल्याने संघांना वारंवार सीमा ओलांडावी लागणार आहे. मात्र सिंगल-एंट्री व्हिसामुळे एकदा अमेरिका सोडल्यानंतर पुन्हा प्रवेश मिळवण्यासाठी नव्याने प्रक्रिया करावी लागू शकते. जागतिक दर्जाचे रेफरी, माध्यम प्रतिनिधी आणि क्रीडाप्रेमींना बॉर्डरवर रोखले गेल्यामुळे आता 'फिफा'वर (FIFA) प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. स्पर्धेची खिलाडूवृत्ती टिकवण्यासाठी आणि हा जागतिक सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रवास आणि व्हिसाशी संबंधित हे गंभीर मुद्दे लवकरात लवकर सोडवावेत, अशी मागणी केली जात आहे.
हे ही वाचा -
