FIFA World Cup 2022: कतारमध्ये खेळवण्यात येणारा FIFA विश्वचषक 2022 त्याच्या समारोपाच्या दिशेने वाटचाल करत आहे. उद्यापासून स्पर्धेच्या सेमीफायनल्सला सुरुवात होणार आहे. अर्जेंटिना (Argentina), क्रोएशिया (Croatia), मोरोक्को (Morocco) आणि फ्रान्स (France) या चार संघांनी सेमिफायनल्समध्ये धडक दिली आहे. तर उर्वरित 28 संघांनी आपल्या सामानाची आवराआवर करुन घरची वाट धरली आहे. सेमीफायनल्सच्या (FIFA Semifinal) पहिल्या सामन्यात अर्जेंटिना आणि क्रोएशिया यांच्यात लढत होणार आहे. तर सेमिफायनल्सच्या दुसऱ्या सामन्यात मोरोक्को आणि फ्रान्स आमनेसामने असतील. तसेच, यंदाच्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. 


फिफा सुरू होण्याआधीपासूनच काही दिग्गज फुटबॉलर्सबद्दल बरीच चर्चा रंगली होती. या खेळाडूंमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, केलियन एमबाप्पे, हॅरी केन, रॉबर्ट लेवांडोस्की आणि नेमार ज्युनियर यांचा समावेश होता. आता सेमीफायनल्समध्ये चॅम्पियन बनण्याच्या शर्यतीत यापैकी फक्त लिओनेल मेस्सी आणि कायलियन एमबाप्पे उरले आहेत. केन, रोनाल्डो, नेमार आणि लेवांडोस्की या उर्वरित तीन खेळाडूंचे संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.


रोनाल्डोचं विश्वचषक पटकावण्याचं स्वप्न भंगलं 


ख्रिस्तियानो रोनाल्डो म्हणजे, अवघ्या फुटबॉल प्रेमींच्या गळ्यातील ताईत. पोर्तुगालकडून खेळणाऱ्या या दिग्गज खेळाडूचं विश्वचषकाला गवसणी घालण्याचं स्वप्न भंगलं. रोनाल्डोच्या नेतृत्त्वात खेळणारा पोर्तुगालचा संघ सेमीफायनलही गाठू शकला नाही. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या पोर्तुगालचा उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मोरोक्कोकडून 1-0 असा पराभव झाला. या विश्वचषकात स्वतः ख्रिस्तियानो रोनाल्डोही फारशी कामगिरी करु शकला नाही. रोनाल्डोनं संपूर्ण स्पर्धेत केवळ एकच गोल केला. घानाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोनं पेनल्टी किकद्वारे हा गोल केला होता. बाद फेरीदरम्यान ख्रिस्तियानो रोनाल्डोला सुरुवातीच्या इलेव्हनमध्येही स्थान मिळालं नाही. दरम्यान, 37 वर्षीय दिग्गज फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा कदाचित शेवटचा विश्वचषक असू शकतो. पण अद्याप रोनाल्डोकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 


नेमार-लेवांडोस्की आणि केनही अपयशी


स्टार फुटबॉलपटू नेमारसाठी ही स्पर्धा अत्यंत निराशाजनक ठरली. उपांत्यपूर्व फेरीत नेमारचा संघ ब्राझीलचा पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाकडून पराभव झाला. तसेच, स्वतः 30 वर्षीय नेमारलाही केवळ दोनच गोल करता आले. लेवांडोस्कीचा संघ पोलंडची अवस्था तर आणखी वाईट होती. प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोलंडला फ्रान्सनं पराभूत केलं. 34 वर्षीय रॉबर्ट लेवांडोस्कीची कामगिरी निराशाजनक होती आणि त्याला चार सामन्यांत केवळ दोनच गोल करता आले. 


यंदाचा फिफा विश्वचषक इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनसाठी काही खास राहिला नाही. उपांत्यपूर्व फेरीत एकेकाळचा चॅम्पियन इंग्लंडचा गतविजेता फ्रान्सकडून 2-1 असा पराभव झाला. 2018 च्या विश्वचषकात गोल्डन बूट जिंकणाऱ्या हॅरी केननं यावेळी केवळ दोन गोल केले. फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात तो पेनल्टीही चुकला होता. 


मेस्सी आणि एमबाप्पे फॉर्मात 


लियोनेल मेस्सी आणि किलियन एमबाप्पे स्पर्धेत फॉर्मात आहे. ज्यामुळे त्यांचे दोन्ही संघ उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी झाले आहेत. दोन्ही खेळाडू 'गोल्डन बूट' शर्यतीत आघाडीवर आहेत. 23 वर्षीय एमबाप्पेनं आतापर्यंत पाच सामन्यांत पाच गोल केले आहेत. एमबाप्पेनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक गोल केला आणि डेन्मार्क आणि पोलंडविरुद्ध प्रत्येकी दोन गोल केले.


त्याचबरोबर 35 वर्षीय मेस्सीनं पाच सामन्यांत चार गोल केले आहेत. मेस्सीनं सौदी अरेबिया, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्सविरुद्ध गोल केले. अर्जेंटिना आणि फ्रान्स या संघांनी आपापल्या उपांत्य फेरीतील सामने जिंकल्यास अंतिम फेरीत मेस्सी आणि एमबाप्पे यांच्यात रंजक लढत होईल.


फिफा वर्ल्ड कप सेमीफायनलचं शेड्यूल 


13 डिसेंबर : क्रोएशिया vs अर्जेंटीना (रात्री उशिरा 12.30 वाजता)
14 डिसेंबर : मोरक्को vs फ्रान्स (रात्री उशिरा 12.30 वाजता)