मॉस्को : जपान आणि सेनेगल संघांमधला 'ह' गटातला दुसरा साखळी सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. या सामन्यात 1-2 अशा फरकानं पिछाडीवर असताना जपानला शेवटच्या काही क्षणी सामना ड्रॉ राखण्यात यश मिळालं.
सेनेगलच्या सादिओ मॅनेनं 11 व्या मिनिटाला गोल डागत सेनेगलला आघाडी मिळवून दिली. पण 34 व्या मिनिटालाच ताकाशी इनुईनं 15 मीटरवरुन चेंडू गोलपोस्टमध्ये धाडत जपानला बरोबरीवर आणून ठेवलं.
71 व्या मिनिटाला सेनेगलच्या मौसा वेगनं दुसरा गोल नोंदवला. त्यामुळे सेनेगल या सामन्यात जिंकणार असं दिसत असतानाच बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या केईसुक होंडानं जपानला 2-2 अशी बरोबरी साधून दिली.