मोस्को (रशिया) : फिफा विश्वचषकात इंग्लंडने कोलंबियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात करत उपांत्यपूर्वफेरीत धडक मारली. इंग्लंडने कोलंबियावर 4-3 ने विजय मिळवला. इंग्लंडनं 2006 सालानंतर यंदा तब्बल बारा वर्षांनी विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.


सामन्यात मध्यंतरापर्यंत दोन्ही संघाला एकही गोल मारता आला नाही. मध्यंतरानंतर कर्णधार हॅरी केननं 57 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर गोल करत इंग्लंडचं खातं उघडलं. मध्यंतरानंतरच्या सत्रात मिळालेल्या अतिरिक्त वेळेत कोलंबियाच्या येरी मिनाने 93 व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करत १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर निर्धारित वेळेत आणि जादा वेळेतही १-१ अशी बरोबरीची कोंडी फुटू शकली नाही.


पेनल्टी शूटआऊटमध्ये मिळालेल्या पहिल्या दोन संधीतच इंग्लंडने गोल मारले. पण इंग्लंडच्या जॉर्डनची तिसरी पेनल्टी किक कोलंबियाचा गोलरक्षक डेव्हीड ओसपिनाने रोखली. तर कोलंबियाच्या फाल्काव, क्वाड्राडो आणि म्युरियल या तिघांनी पेनल्टीवर लागोपाठ गोल केले. त्यानंतर कोलंबियाच्या उरीबीने चौथी पेनल्टी वाया घालवली पण इंग्लंडकडून ट्रीपरने गोल करण्यात कोणतीही चूक केली नाही. इंग्लंडचा गोलरक्षक जॉर्डन पिकफर्डनं कोलंबियाच्या बाकाची शेवटची निर्णायक पेनल्टी थोपवली. तर अखेरच्या पाचव्या पेनल्टीवर इंग्लंडच्या डायरनं गोल करत इंग्लंडला 4-3 असा विजय मिळवून दिला.